पोलीसांनी धाड टाकताच उघड झाला सर्व प्रकार
ज्ञानेश्वर काकड | नाशिक
विक्री करण्याच्या उद्देशाने मनेगाव येथील आंबेडकरनगरात घराच्या परसबागेत लावलेली गांजाची २४ झाडे सिन्नर पोलिसांच्या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी राजेश रामचंद्र जाधव (४३) यास अटक केली असून, त्याच्याकडून ७० हजार रुपये किमतीचा सुमारे ७ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
मनेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमधील राजेश रामचंद्र जाधव याने त्याच्या राहत्या घराच्या परसबागेत अवैधरीत्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने गांजाच्या झाडांची लागवड केली आहे. सिन्नर पोलिसांना गुप्त खबर्यामार्फत ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. २८) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीस पथकाने घटनास्थळी धाड टाकली. तेथे परसबागेत लावलेली २४ गांजाची झाडे मुळासकट उखडून टाकली. या झाडांपासून ७ किलो वजनाचा ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८, २० (अ), २० (ब) (ई) प्रमाणे संशयित राजेश रामचंद्र जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचया संकल्पनेतून अमली पदार्थमुक्त भारत या ध्येयांतर्गत अमली पदार्थ विरोधी अभियान २०२५ अंतर्गत अवैध अमली पदार्थावर कायदेशीर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. अपर पोलीस अधीक्षक अदित्य मिरखेलकर यांच्या सूचनेवरून व उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. नायब तहसीलदार सागर मुंदडा, कृषी अधिकारी ढोके यांच्यासह सरकारी पंचांच्या उपस्थितीत या घटनेचा पंचनामा करण्यात आला. या कारवाईत सपोनि रूपाली चव्हाण, हवालदार गणेश वराडे, मुकेश महिरे, रविराज गंवडी, साई नागरे, अमोल सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.