बीड : शहरापासून काही अंतरावर असलेल्या पेंडगाव येथे दर्शनासाठी जाणार्या भाविकांना ट्रक चालकाने शनिवार दि.३० पहाटे चिरडले. यामध्ये ठार झालेल्या भाविकांनामध्ये बीड शहर आणि शिदोड गावच्या रहिवाशांचा समावेश आहे.
मृत्यूमुखी पडलेले सर्वजण बीड शहर व तालुक्यातील शिदोड गावचे रहिवाशी आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील एसआर जीनिंगजवळ शनिवारी (दि.३०) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे. भरधाव कंटेनरने (एमएल-01 एजी-3197) सहा जणांना चिरडले होते. यापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी असलेले दोघे उपचारादरम्यान दगावले.
या अपघातात दिनेश दिलीप पवार (रा. माऊली नगर, बीड), पवन शिवाजी जगताप (रा. अंबिका चौक, बीड), अनिकेत रोहिदास शिंदे (रा. शिदोड, ता. बीड), किशोर गुलाब तोर (रा. बाभूळतारा, ता. गेवराई), आकाश अर्जुन कोळसे (रा. रिलायन्स पंप परिसर, बीड) आणि विशाल श्रीकिसन काकडे (वय २२, रा. शेकटा, ता. शेगाव) या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हे सहाही युवक पायी चालत पेंडगाव येथे मारुतीरायाच्या दर्शनासाठी जात होते. नामलगाव उड्डाणपूल पार करून पुढे एसआर जीनिंगजवळ ते चालत असताना पाठीमागून आलेल्या कंटेनरने त्यांना चिरडले.घटनेनंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक बाळराजे दराडे, प्रसाद कदम तसेच महामार्ग पोलीस गजानन जाधव, बालाजी ढगारे, तात्या बांगर, सदगर यांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनरचे दोन्ही चालक ताब्यात घेतले. मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. महामार्गाला सर्विसरोड नसल्याने अशा अपघातांचे प्रमाण वाढले असून या भीषण दुर्घटनेने जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.