बीड : प्रेम संबंधातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बीडमधील गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे घडली आहे. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पाच जणांवर तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आता यात खूनाचे कलम वाढविले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शिवम काशिनाथ चिकणे असे २१ वर्षीय तरुणाचे नाव असून तो अभियंत्रिकीचे शिक्षण घेत होता. शिवमचे गावामधीलचं एका मुली सोबत प्रेमसंबंध होते. प्रेयसीने घरी बोलावले असताना त्यावेळी अचानक नातेवाईक तेथे आले आणि त्यांच्यात वाद झाला. दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी शिवमला रस्त्यात गाठून लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर शिवमला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.