spot_img
21 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

spot_img

बापासमोरच बिबट्याने तरूणीला ओढत नेलं

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वनारवाडीतील २१ वर्षीय पायल चव्हाण या युवतीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. शेतात काम करताना बिबट्याने मुलीवर हल्ला केला होता. वडिलांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेने वानरवाडी गावावर शोककळा पसरली आहे. वनविभागाच्या निष्क्रियतेवर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नाशिक-दिंडोरी राज्य मार्गावरील वनारवाडी पाटाजवळ चव्हाण कुटुंबीय आपल्या शेतात गवत कापण्याच्या कामात व्यस्त होते. पायल ऊसाच्या शेतालगत गवत कापत होती. त्याचवेळी दबक्या पावलाने अचानक बिबट्याने मागून येऊन झडप घातली. बिबट्याने पायलला ६-७ फूट ओढत नेले. तिच्या किंचाळ्या ऐकून आजूबाजूचे शेतकरी आणि तिचे वडील धावले. गोंधळात बिबट्याने पायलला तिथेच सोडून पळ काढला. रक्तबंबाळ अवस्थेत पायलला नातेवाइकांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेले. परंतु तिथे उपचारास नकार मिळाला. अखेर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेने गावकर्‍यांमध्ये भीती आणि रोष पसरला आहे. यापूर्वीही या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याच्या तक्रारी वनविभागाकडे करण्यात आल्या होत्या. परंतु कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पायलच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, वनविभागाने तपास सुरू केला आहे. मात्र, वारंवार घडणार्‍या अशा घटनांमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. स्थानिकांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

ताज्या बातम्या