अश्विनी खिंडकरची कारागृह अधीक्षकांकडे कळकळीची विनंती
बीड : संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असून तो सध्या बीडच्या तुरुंगात आहे. बीडमध्ये कारडची मोठी दहशत होती. खंडणी, अपहरण प्रकरणात कराड सहभागी असल्याचं सांगण्यात येते. देशमुख हत्या प्रकरणातील आकाची दहशत तुरुंगातील आरोपींमध्येही असल्याचं दिसत आहे. याचमुळे एका आरोपीच्या पत्नीने कारागृह अधीक्षकांना पत्र लिहून पतीचा जीव वाचवा, अशी विनंती केलीय.
या महिलेचा पती हा कराडच्या बराकमध्येच आहे. आरोपीचं नाव दादासाहेब खिंडकर असून तो .धनंजय देशमुख यांचा साडू आहे. एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी तो तुरुंगात आहे. दरम्यान वाल्मिक कराडही त्याच कारागृहात असल्याने त्याच्या पत्नीने कारागृह अधीक्षकांना पत्र लिहिले आहे.
देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या बराकमध्येच धनंजय देशमुखचे साडू दादासाहेब खिंडकर आहेत. त्यामुळे पत्नी अश्विनी खिंडकर यांना पतीच्या जिवाची चिंता लागलीय. अश्विनी खिंडकर यांनी जिल्हा कारागृह अधीक्षकांना पत्र लिहित त्यांचा जीव वाचवण्याची विनंती केलीय. कराडसह इतर आरोपींपासून आपल्या पतीच्या जिवाला धोका असल्याचं त्यांनी निवेदन पत्रात म्हटलंय.
आरोपी वाल्मिक कराडसह इतर ५ आरोपी बीड जिल्हा कारागृहामध्ये आहेत. याच कारागृहात दादासाहेब खिंडकर आहे. दादासाहेब याने ओमकार सातपुतेला अमानुष मारहाण केली होती. या प्रकरणी तो न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र या जिल्हा कारागृहामध्ये देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असल्यामुळे त्याच्या जिवाला धोका असल्याचं पत्नी अश्विनी खिंडकर म्हणाल्या आहेत.
माझ्या पतीच्या जिवाला धोका असल्याबाबत मला समजले आहे. माझ्या पतीच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना कायमस्वरूपी पोलीस गार्डचे संरक्षण द्यावे. त्यांना इतर बारकमध्ये ठेवण्यात यावे, अशी विनंती अश्विनी खिंडकर यांनी केलीय. त्याचबरोबर त्यांना सीसीटीव्हीच्या निगरानीत ठेवावे अशी विनंती अश्विनी दादासाहेब खिंडकर यांनी केली आहे.