पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
नागपूर: बीडच्या पालकमंत्रीपदापासून धनंजय मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या भगिनी आणि राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केले आहे. मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालं आहे. त्यात मी सुखी आहे. मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर मला आनंद झाला असता. कारण मी पाच वर्ष बीडची पालकमंत्री होती. तेव्हा बीडचा विकास चांगला झाला होता. आता जे निर्णय झाले त्याच्याशी असहमती न दर्शवता मी अधिक जोमाने काम करणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. त्या सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली होती. मात्र, यामध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे या दोन जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री नेमण्याच्या आदेशाला तातडीने स्थगिती देण्यात आली होती. याविषयी पंकजा मुंडे यांना विचारले असता त्यांनी यावर फार बोलण्यास नकार दिला. नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली यासंदर्भात मला काही माहिती नाही, मी बोलणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
मी माझ्या खात्याशी संबंधित पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी आज नागपूरला आली आहे. बीडच्या पालकमंत्री पदाबाबत मी अगोदरच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मला जालना येथील पालकमंत्री पद मिळाले. त्या ठिकाणाहून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मला मिळालेली संधी माझ्यासाठी अनुभव आहे, असं समजून मी पुढे वाटचाल करत असते. प्रत्येकवेळी तुम्हाला सारखं काम करायला मिळेल असं नाही. तर मी पूर्वी पाच वर्षे कोणत्याही पदावर नसताना पूर्ण वेळ संघटनेचे काम केले, असे पंकजा मुंडे यांनी सांगितली.
पंकजा मुंडेंच्या मनात बीडचं पालकमंत्रीपद न मिळाण्याची सल?
मी बीडची मुलगी असल्याने जर मला बीडचा पालकमंत्री पद मिळालं असतं तर बीडची सेवा करण्याची संधी मला मिळाली असती तर आणखी आनंद झाला असता. माझा पाच वर्षातील कार्यकाळ बीडसाठी सर्वाधिक विकसनशील कार्यकाळ राहिला आहे. आता झालेल्या निर्णयाला कोणतीही असहमती न दर्शविता मिळालेल्या संधीला जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या कार्यकाळात बीडचा विकास झाला होता, असे सांगत बीडच्या पालकमंत्रिपदावर आपला ठाम दावा होता, असे पंकजा मुंडे यांच्याकडून अप्रत्यक्षपणे सांगण्यात आल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.
जालना जिल्ह्यात मला डबल लक्ष द्यावे लागेल. बीडचे पालकमंत्री अजितदादा आहेत. ते आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा मला विश्वास आहे. कोण कोणाला काय म्हणाले यावर मी कधीच बोलत नाही. माझ्या भूमिकेवर मी बोलू शकेन, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.