spot_img
-0.7 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

spot_img

परळीतून सुटणार्‍या सर्व बसफेर्‍या रद्द

परळी – कौडगाव बसवर दगडफेक
परळी वैजनाथ : खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक झाल्याचे सकाळपासून दिसून येत आहे. या अनुषंगाने काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने परळी बस स्थानकातून सुटणार्‍या सर्व बसेस रद्द केल्या आहेत. सकाळपासूनच कराड समर्थक आक्रमक झाले आहेत. काही क्षणात परळी शहर बंद करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परळी आगारातून सुटणार्‍या बसेस रद्द करण्यात आल्या. काही वेळापूर्वीच परळी- कौडगाव कानडी या बसवर अज्ञात लोकांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
याबाबत आगार प्रमुखांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बसेसची तोडफोड होऊ नये या दृष्टिकोनातून काही वेळासाठी बस बंद करण्यात आल्या होत्या. दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत बीड मार्गावरील सर्व बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र काही वेळापूर्वीच बस सुरू केल्या होत्या. परंतु परळी बंद व अनेक ठिकाणी होणारे रस्ता रोको आदीच्या वृत्ताच्या अनुषंगाने वरिष्ठांनी परळी आगारातून बस सेवा बंद ठेवण्याबाबत सूचना केल्या असुन त्या अनुषंगाने परळीतून सुटणार्‍या सर्व बसेस रद्द करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
मस्साजोग येथील खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराड यांच्या आईने सकाळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या समर्थनार्थ शेकडा समर्थक पोलिस ठाण्यासमोर जमा झाले. परळी शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी याच्या समर्थनार्थ आंदोलने सुरू झाली. त्यानंतर प्रचंड घोषणाबाजी व आक्रमक पवित्रा घेत आत्मदानाचाही प्रयत्न काही समर्थकांनी केला. परळी तालुक्यात काही ठिकाणी रस्ता रोकोचाही प्रकार समोर आला. त्यानंतर एसटी महामंडळाने बस फेर्‍या रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, परळी- कौडगाव कानडी या बसवर अज्ञात लोकांनी दगडफेक केल्याची घटनाही पुढे आली आहे. दरम्यान आता परळी आगारातून सर्व बस फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या