राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
बीड : जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात फरार आरोपींना अटक व्हावी, यासाठी जनतेतून पोलिसांवर दबाव आहे. त्यातच, विरोधकांनीही हा मुद्दा चांगलाच लावून धरला असून कॉंग्रेस, शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते मंत्री धनजंय मुंडेंच्या राजीनाम्याची आणि वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील ह्या प्रकरणात देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून बीडमध्ये तळ ठोकला आहे. पोलिसांना तपासात मदत करताना सत्ताधार्यांवर बीडच्या मंत्रीमहोदयांवर त्यांच्याकडून जोरदार टीका केली जात आहे. तसेच, वाल्मिक कराडच्या अटकेची मागणीही त्यांच्याकडून केली जात आहे. मात्र, पोलिसांकडून अद्यापही हत्याप्रकरणातील ३ आरोपी व खंडणीप्रकरणातील वाल्मिक कराडचा शोध घेतला जात आहे. आता, वाल्मिक कराड बीड पोलिसांना शरण येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
बीड जिल्ह्यात २८ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मारेकर्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी सर्वच नेत्यांनी केली. त्यासह, वाल्मिक कराडच या घटनेतील मुख्य सुत्रधार असून त्यालाही अटक करण्याची मागणी आमदार, खासदार व स्थानिक नेत्यांनी केली. तसेच, मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिल्यास मी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारेन, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय. तर, धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जात असल्याचंही नेत्यांनी म्हटलं होतं. अखेर, सीआयडीच्या तपासाचा वेग, पोलिस यंत्रणा व सरकावर वाढत असलेला राजकीय, सामाजिक दबाव लक्षात घेत आता वाल्मिक कराड शरण येत असल्याची माहिती आहे.
कोणत्या गुन्ह्यात होणार अटक
वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवतण्यात येत असूनउद्या किंवा परवा शरण येण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, आता वाल्मिक कराडला कोणत्या गुन्ह्यात पोलिसांकडून अटक केली जाते हे पाहावे लागेल. कारण, खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड आरोपी असून अद्याप खूनप्रकरणात त्यास आरोपी करण्यात आले नाही. त्यामुळे, आमदार जितेंद्र आव्हाड व अंजली दमानियांकडून खूनप्रकरणातही वाल्मिक कराडला गुन्हा दाखल करुन अटकेची मागणी केली आहे. पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असून उर्वरीत तीन फरार आरोपींना देखील अटक कधी होणार, हाही प्रश्न अनुत्तरीत आहे.