पीएसआय आणि आरोपीच्या भेटीचा व्हिडीओ समोर
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आठवडा उलटून गेल्यानंतरही गुन्ह्यातील सातपैकी फक्त तीन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर चार आरोपी अजूनही फरार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पोलीस प्रशासन आणि सरकारविरोधात रोष व्यक्त केला जात असतानाच एक खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. केजचा पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हे दोघे हत्येची घटना होण्यापूर्वी केज शहरातील वसंत विहार उडप्पी हॉटेलमध्ये सरपंच यांच्या भावासोबत भेटल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या भावाबरोबर कशा बद्दल बोलणे चालू होते. हे मात्र समजू शकले नाही. आणि दुसर्या दिवशी घटना घडली.
संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर कारवाईस टाळाटाळ केल्याप्रकरणी याआधीच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील याला निलंबित करण्यात आलं आहे. अशातच पाटील हा हत्येची घटना होण्यापूर्वी आरोपी सुदर्शन घुले याला का भेटला होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि नराधम आरोपी यांच्या संगनमतानेच या हत्येचा कट रचला गेला का, असाही सवाल जिल्ह्यातील नागरिकांकडून विचारला जात आहे.
नागरिकांतील वाढता रोष पाहून आणि आंदोलकांना दिलेले आश्वासन पूर्ण करत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना हत्या प्रकरणानंतर सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. त्यानंतर केज पोलीस ठाण्याची जबाबदारी जबाबदारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आली.
बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ३ वाजता संतोष देशमुख यांचं घुले आणि इतर नराधमांनी अपहरण केल्यानंतर संतोष देशमुख यांचे आत्येभाऊ याबाबतची फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र पोलिसांनी तब्बल ३ तास अपहरणाची फिर्यादच नोंदवून घेतली नाही. शिवाय देशमुख यांच्या शोधासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. पोलिसांनी तात्काळ शोधाशोध केली असती तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता, असा आरोप आमदार धस यांनी केला आहे.