पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले!
नागपूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे ते आरोपी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या जवळचे असल्याचा आरोप होत आहे. तसंच हत्या प्रकरणानंतर कराड यांच्याविरोधात 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हाही दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात लक्ष्य केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडली आहे आणि वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या संबंधांवरही भाष्य केलं आहे.
बीड जिल्ह्यात माझ्यासाठी आणि पंकजा मुंडेंसाठी काम करणारी असंख्य लोकांची टीम आहे, त्यात एक वाल्मिक कराड आहेत. त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा का दाखल झाला आहे, कशामुळे झाला आहे, त्यांचा संबंध किती आहे, या सर्व गोष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज विधिमंडळात निवदेन मांडणार आहेत त्यामध्ये येतील, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या दसरा मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या जवळीकीविषयी बोलताना ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड असा उल्लेख केला होता.
ज्या पवनचक्की कंपनीच्या कार्यालय परिसरात झालेल्या वादावरून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्या पवनचक्की कंपनीच्या अधिकार्याकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह तिघांविरोधात केज पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. वाल्मिक कराड (रा. परळी), विष्णू चाटे (रा. कौडगाव, ता. केज) व सुदर्शन घुले (रा. टाकळी, ता. केज) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, या खंडणी प्रकरणातील काही आरोपींची सरपंच हत्या प्रकरणातील गुन्ह्यातही नावे आहेत. त्यामुळे मस्साजोगच्या गावकर्यांसह विविध नेत्यांकडून हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात येत असून त्यांच्या अटकेची मागणी होत आहे.