spot_img
6.7 C
New York
Wednesday, December 18, 2024

Buy now

spot_img

पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंनी घेतली शपथ

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूरच्या राजभवनात पार पडला. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या १६ डिसेंबरपासून सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी सोहळा घेण्यात आला. १९९१ नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी झाला असून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नवीन ३९ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
बीड जिल्ह्याचे नेते पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंनी शपथ घेतली. धनंजय मुंडे विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यांना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मंत्रिपद दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर येथील राजभवनावर पार पडला. या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी भाजप आमदार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. कधीकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक अशी ओळख असलेल्या या मुंडे बहीण-भावाने महायुती सरकारमध्ये एकाच दिवशी घेतलेली मंत्रिपदाची शपथ राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.
धनंजय मुंडे यांनी त्यांचे काका आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवगंत गोपीनाथ मुंडे यांच्याशी झालेल्या राजकीय मतभेदानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर धनंजय यांनी परळीतून २०१४ साली पंकजा मुंडे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी ४० हजारांहून अधिक मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. या राजकीय संघर्षामुळे भावा-बहिणीच्या नात्यातील दरीही वाढली होती. मात्र २०२३ मध्ये राजकीय समीकरणे बदलली आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाली. धनंजय मुंडे यांनीही अजित पवारांची साथ दिल्याने त्यांना तेव्हाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. मात्र २०१९ च्या पराभवामुळे सभागृहाबाहेर असलेल्या पंकजा मुंडे यांच्या नशिबी राजकीय वनवास होता.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत मुंडे बहीण-भाऊ पूर्ण ताकदीने एकत्र आले होते. पण तरीही पंकजा मुंडे यांना ६ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भाजपने पंकजा यांना विधानपरिषदेवर संधी दिली. त्यामुळे आमदार झालेल्या पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये संधी मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता होती. तर दुसरीकडे, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग इथं झालेल्या सरपंच हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांनाही मंत्रिपद देऊ नये, अशी मागणी होत होती. त्यामुळे मुंडे बहीण-भावाला मंत्रिपद मिळणार की नाही, याबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये धाकधूक होती. परंतु आता अखेर भाजपने पंकजा मुंडे यांना तर राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला असून आज या दोघांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

मंत्रिमंडळात कोणकोणत्या नेत्यांना स्थान?
१. चंद्रशेखर बावनकुळे
२. राधाकृष्ण विखे-पाटील
३. हसन मुश्रीफ
४. चंद्रकांत पाटील
५. गिरीश महाजन
६. गुलाबराव पाटील
७. गणेश नाईक
८. दादा भुसे
९. संजय राठोड
१०. धनंजय मुंडे
११. मंगलप्रभात लोढा
१२. उदय सामंत
१३. जयकुमार रावल
१४. पंकजा मुंडे
१५. अतुल सावे
१६. अशोक उईके
१७. शंभूराज देसाई
१८. आशिष शेलार
१९. दत्तात्रय भरणे
२०. आदिती तटकरे
२१. शिवेंद्रसिंहराजे भोसले
२२. माणिकराव कोकाटे
२३. जयकुमार गोरे
२४. नरहरी झिरवळ
२५. संजय सावकारे
२६. संजय शिरसाट
२७. प्रताप सरनाईक
२८. भरत गोगावले
२९. मकरंद पाटील
३०. नितेश राणे
३१. आकाश फुंडकर
३२. बाबासाहेब पाटील
३३. प्रकाश आबिटकर
३४. माधुरी मिसाळ
३५. आशिष जैस्वाल
३६. पंकज भोयर
३७. मेघना बोर्डिकर
३८. इंद्रनील नाईक
३९. योगेश कदम
दरम्यान, महायुतीच्यामंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिल्याचं दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही चेहरे मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या