नागपूर राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर सोमवारी रात्री हल्ला झाला होता. त्यांच्या गाडीवर दगड फेकण्यात आला होता. यामध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर आता भाजपचे नेते परिणय फुके यांनी या संपूर्ण प्रकरणात काहीतरी काळबेरं असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ते मंगळवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी परियण फुके यांनी म्हटले की, अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला ‘फेक दगडफेक’ आहे. सगळं स्क्रीप्टेड झालं असं दिसत आहे. पोलिसांनी तातडीने एसआयटी नेमून याप्रकरणाची चौकशी सुरु करावी. उद्याच्या मतदानावर याचा परिणाम होणार नाही. चौकशीत सत्य बाहेर आले पाहिजे. सलील देशमुख यांचा पराभव होत असल्याने अनिल देशमुख यांनी स्वतःवर ‘फेक दगडफेक’ केली, असा आरोप परिणय फुके यांनी केला.