मुंबई : राज्यातील महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी असून लाडक्या बहिणींना (थ्व्ग् ंप्ग्ह ब्दरह) मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची मुदत आता १५ ऑक्टोंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे, ज्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अद्याप अर्ज भरले नाहीत, त्या लाडक्या बहिणींना आपले अर्ज भरता येणार आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज करण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२४ च्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मात्र, हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच भरण्यात यावेत, अशी सूचना शासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे, लाडक्या बहिणींना आता नव्याने अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. पुढील ४ दिवसांत अर्ज करुन या योजनेचा लाभ घेता येईल. राज्यात आत्तापर्यंत २ कोटी ३० लाख बहिणींच्या खात्यात ५ महिन्यांचे हफ्ते सरकारकडून जमा करण्यात आले आहेत.
राज्यातील लाडकी बहीण योजनेला मिळणार उदंड प्रतिसाद पाहून राज्य सरकारकडून या योजनेला मुदतवाढ दिली जात आहे. यापूर्वी ३० सप्टेंबरपर्यंत ह्या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, गेल्या महिन्यातही लाखो महिलांना आपले अर्ज सादर केले आहेत. ज्या महिलांनी अर्ज सादर केले, त्यांना या योजनेचा लाभही मिळण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधन सणाचा मुहूर्त साधत राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या हफ्याच्या वितरणास सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल २ कोटी ३० लाख महिला या योजनेत पात्र ठरल्या असून त्यांच्या बँक खात्यावर पैसेही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश महिलांच्या बँक खात्यात तब्बल ५ हफ्ते म्हणजे ७५०० रुपये जमा झाले आहेत. आता, उर्वरीत महिलांनाही लाडकी बहीण योजनेसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. मात्र, त्यासाठी केवळ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्ज करता येईल.
लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये सातत्याने जुंपल्याचं दिसून येतय. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. त्यानंतर, आता एकनाथ शिंदे यांनीही पलटवार केला आहे. राज्यात अनेक योजना यशस्वी राबवण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. या योजनेत कुणी खोडा घातला तर येणार्या निवडणुकीत लाडक्या बहिणी तुम्हाला खोडा घातल्या शिवाय राहणार नाहीत, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रागयडमध्ये आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलताना दिले. यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे या देखील उपस्थित होत्या. राज्यात आत्तापर्यंत २ कोटी ३० लाख बहिणींच्या खात्यात पाच हप्ते जमा झाले आहेत. जवळपास १७००० कोटी रुपयांचे वितरण सरकारनं लाडक्या बहिणींना केलं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आमची देण्याची वृत्ती आहे. ही योजना बंद पडणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हे सरकार ऍडव्हान्समध्ये देणारं सरकार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेमुळं विरोधकांची तोंड काळी झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.