पुणे : पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी येथील एका लॉजमध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये तरूणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी परिसरात असलेल्या राज नावाच्या लॉजमध्ये हा प्रकार घडला आहे. नितेश नरेश मिनेकर असं आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे. हा सर्व प्रकार प्रेम प्रकरणातून झाला असावा असा प्राथमिक अंदाज पिंपरी पोलिसांनी वर्तविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितेश मिनेकर हा आपल्या प्रेयसी सोबत लॉजमध्ये जात असतानाची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. लॉजमध्ये गेल्यानंतर काही वेळाने नितेश मिरेकर याने आपल्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे. संबधित घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलिस करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.