बीड : जिल्ह्यातील पाटोदा येथील महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये झालेल्या अपहार प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामकृष्ण बांगर यांच्या पत्नी सत्यभामा बांगर यांना पाटोदा पोलिसांनी अटक केली आहे. 13 कोटींच्या अपहार प्रकरणी ही अटक करण्यात आली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सन 2011 ते 2015 कालावधी दरम्यान महात्मा फुले अर्बन बँकेमध्ये 13 कोटींचा बनावट दस्तावेज सादर करून सत्यभामा बांगर यांनी अपहार केल्याचा आरोप आहे. रामकृष्ण बांगर यांनी देखील पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना बाजार समितीची जमीन बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणात देखील गुन्हा नोंद झाला होता. आता त्यांच्या पत्नी बँकेच्या अपहार प्रकरणात अडचणीत आल्या असून त्यांना अटक झाली आहे.
सत्यभामा बांगर यांनी कोणतीही कागदपत्रं न घेता, तारण न घेता बनावट कागदपत्रं तयार करून ते खरी असल्याचं भासवून 13 कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. आता याच प्रकरणात बांगर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ झाली असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.