माहिती आयुक्तांनी फटकारले
छत्रपती संभाजीनगर : आले मनात की टाकला आरटीआय, असा खाक्या सध्या अनेकांनी अवलंबला आहे. आरटीआयच्या अशा अनिर्बंध वापराचा नमुना नुकताच पुढे आला. एका व्यक्तीने माहिती अधिकारात तब्बल दहा हजार अर्ज केले. विशेष म्हणजे, केवळ तीन वर्षात दोन हजार ७८८ द्वितीय अपील दाखल केले. परंतु, यात कायद्याचा दुरुपयोग होतोय, असा निष्कर्ष नोंदवून माहिती आयुक्तांनी अवघ्या एकाच दिवसात हे सर्व अपील फेटाळून लावले.
आरटीआयचा भरमसाठ वापर करणार्या या व्यक्तीचे नाव आहे केशवराजे निंबाळकर. ते बीडमधील रहिवासी आहेत. अनेक शासकीय आस्थापनांनी आपल्या अर्जांवर कार्यवाहीच केली नाही, असे त्यांचे मत आहे.
त्यामुळे २०२१ ते १० जून २०२४ या तीन-साडेतीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडे दोन हजार ७८८ द्वितीय अपील दाखल केले. पहिल्यांदा अर्ज, त्यानंतर प्रथम अपील करूनही इतक्या मोठ्या प्रमाणात द्वितीय अपील का दाखल करावे लागले, असा प्रश्न आयोगाला पडल्याने या प्रकरणावर २६ जून रोजी माहिती आयुक्त मकरंद रानडे यांनी सुनावणी ठेवली.
त्यात निंबाळकर यांच्या द्वितीय अपिलात आलेली बहुतांश कारणे सारखीच आढळली. अर्ज आणि प्रथम अपील केलेल्या प्राधिकरणांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली, प्रथम अपिलीय अधिकार्यांनी निर्णयच दिला नाही, अशीच कारणे सर्व द्वितीय अपिलांमध्ये नमूद आहेत.
एकाच व्यक्तीने हजारोच्या संख्येने माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज करणे कायद्यात अभिप्रेत नाही. अर्जांची प्रचंड संख्या बघता अपिलार्थी हे माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून शासकीय कार्यालये, प्राधिकरणांना वेठीस धरत आहेत. यातून कोणतेही जनहित साध्य होत नाही. अशा अमर्यादित आरटीआय अर्ज करण्याच्या सवयीमुळे शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प होण्याचा धोका आहे, असे निरीक्षण नोंदवीत राज्य माहिती आयुक्त मकरंद रानडे यांनी निंबाळकर यांचे दोन हजार ७८८ द्वितीय अपील एकाख फटक्यात फेटाळून लावले.