spot_img
9.6 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img

नाशकात धुवॉंधार,इगतपुरीत अनेक घरात शिरलं पाणी

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
नाशिक : शहरासह जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७४ टक्के पाऊस झाला असून धरणसाठाही ७२ टक्क्यांवर पोहोचला आहे. येत्या २५ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिली आहे. तर गंगापूर आणि दारणा धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसामुळे रात्री त्र्यंबकेश्वर शहरात पाणी शिरल्याचे दिसून आले. त्र्यंबकेश्वर शहरात पावसाचे पाणी आल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने दारणा आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
गंगापूर धरणातून सकाळी ८ वाजता ५२० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तर दि. शुक्रवारी रात्री ९ वाजता दारणा धरणातून ४०० क्यूसेकने वाढ करुन एकूण ८५० क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते.मात्र पावसाची संततधार कायम असल्याने दारणातून विसर्ग वाढवून २ हजार ६२ क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.
इगतपुरी तालुक्यात शुक्रवारी दुपारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे इगतपुरी शहरातील खालच्या पेठ येथील रहिवाशांच्या घरात थेट पावसाचे पाणी घुसल्यामुळे येथील नागरिकांचे चांगलेच हाल झाल्याचे पाहावयास मिळाले. काही ठिकाणी नुकत्याच भाताच्या आवण्या आवरल्या असल्याने या भात पिकांना पाण्याची आवश्यकता होती. पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर या पावसामुळे हवेत गारवा पसरल्याने उकाड्यापासुन हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. पावसामुळे येवल्यातील जळगाव मौजे येथे सोपान शिंदे यांची गाय मरण पावली, तसेच नांदगाव येथील मौजे पळसी येथे एक बकरीचा मृत्यू झाला. मौजे पिंपरखेड येथे भाऊसाहेब सोनवणे यांच्या घराची भिंत पडली. शनिवार (दि.२४) नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगांव, पुणे जिल्ह्यात तर रविवार (दि. २५) ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात दुपारनंतर गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. २६ ते ३० ऑगस्टपर्यंत ऊन पुन्हा तापणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ताज्या बातम्या