कोल्हापूर : वयोवृद्ध आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने संभाजीनगर येथील उच्चशिक्षित अविवाहित भावंडांनी शिवाजी विद्यापीठ परिसरातील राजाराम तलावात उडी टाकून जीवन संपवले. गुरुवारी (दि. १५) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. भूषण नीळकंठ कुलकर्णी (वय ६१) व ऍड. भाग्यश्री नीळकंठ कुलकर्णी (५७, रा. नाळे कॉलनी) अशी त्यांची नावे आहेत. कस्टम व जीएसटी विभागात अधीक्षकपदावरून निवृत्त झालेल्या अधिकार्याने, विविध शाखेतून २२ पदव्या संपादन केलेल्या आपल्या भगिनीसह जीवनाचा शेवट करून घेतल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या भावंडांनी आपल्या मालकीची स्थावर मालमत्ता कोल्हापूर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांतील काही गरजू व सेवाभावी, धर्मादाय संस्थांना दान केल्याचेही सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. त्याची तपशीलवार माहितीही त्यांनी दिला आहे.
सुसाईड नोटमध्ये दुर्दैवी बहीण-भावांनी म्हटले आहे की, अत्यंत कष्टमय आणि हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जाऊन आम्हा भावंडांचा सांभाळ केलेली आई पद्मजा नीळकंठ कुलकर्णी (वय ८६) यांचा २४ मे २०२४ रोजी मृत्यू झाला. आई ही आमच्या जीवनातील सर्वोच्च स्थान असल्याने तिच्या पश्चात आपण राहू शकत नाही. तिच्या मृत्यूचा विरह आम्ही सहन करू शकत नाही. आम्ही भावंडेही एकाचवेळी आईकडे जात आहोत. आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये.
आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने उच्च विद्याभूषित भावंडांनी राजाराम तलावात उडी टाकून जीवन संपवल्याची बातमी वार्यासारखी पसरताच संभाजीनगर, नाळे कॉलनीसह साळोखेनगर परिसरात शोककळा पसरली आहे. घटनास्थळासह शासकीय रुग्णालय परिसरात नागरिकांनी गर्दी केली. गुरुवारी रात्री उशिरा शासकीय रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. कुलकर्णी यांच्याशी संबंधित असलेले अमोल निरगुंडे ( रा. राजारामपुरी) यांनी भूषण व ऍड. भाग्यश्री यांचे मृतदेह ताब्यात घेऊन पंचगंगा अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. मूळचे कुटुंब कोते (राधानगरी) येथील भूषण व भाग्यश्री कुलकर्णी या भावंडांचे मूळचे कुटुंब कोते (ता. राधानगरी) येथील होते. घरच्या गरिबीमुळे ४०-४५ वर्षांपूर्वी हे कुटुंब कोल्हापूरला स्थायिक झाले. वडिलांच्या निधनानंतर आई पद्मजा यांच्यावर दोन मुलांच्या शिक्षणासह पालनपोषण व घराची जबाबदारी येऊन पडली. काबाडकष्ट करून त्यांनी भूषण व भाग्यश्री यांचे शिक्षण पूर्ण केले.