spot_img
21.2 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

spot_img

 पतीने पत्नीला विहिरीत ढकलले

नाशिक : शेतजमीन घेण्यासाठी पत्नी माहेरून पैसे आणत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला थेट विहिरीत ढकलून दिल्याची संतापजनक घटना खिरमाणी येथे मंगळवारी (दि.13) घडली. याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पत्नीचा खून करणार्‍या सासरच्या मंडळींवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मालेगाव येथील दंगा नियंत्रण पथकाच्या 30 कर्मचार्‍यांची तुकडी ग्रामीण रुग्णालय परिसरात तैनात होती.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी, शेतकरी देवीदास भदाणे हे नवीन शेतजमीन घेण्याच्या प्रयत्नात होते. त्यासाठी पत्नी योगिता ऊर्फ अंजनाबाई भदाणे (35) यांनी माहेरून पैसे आणावेत, यासाठी ते दबाव टाकत होते. यातून दाम्पत्यातील वाद विकोपाला गेला. यातच देवीदास याने पत्नीला शेतातील विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. सायंकाळी विहिरीत मृतदेह तरंगताना दिसून आल्याने घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, योगिता यांच्या माहेरी फोपीर येथे वार्ता पोहोचताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली, रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यावरून माहेर व सासरकडील मंडळीत वाद सुरू होता, माहेरकडील मंडळींनी योगिताच्या सासरच्या मंडळींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली. अखेर संशयित आरोपी पती देवीदास भदाणे, सासरे महादू भदाणे, सासू सगुणाबाई व जिजाबाई भदाणे, दीर प्रवीण भदाणे, जेठानी पूनम भदाणे (सर्व राहणार खिरमाणी) यांच्यावर जायखेडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर मध्यरात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत योगिता यांच्या पश्‍चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सहायक पोलिस निरीक्षक शिरसाठ हे पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या