spot_img
18.5 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img

जिथे ज्या पक्षाचा आमदार, ती जागा त्याच पक्षाची-ना.धनंजय मुंडे

डॉ.योगेश क्षीरसागर यांना बीड विधानसभेतून उमेदवारीचे संकेत
प्रवक्तापदी निवडीबद्दल धनंजय मुंडेंचा सत्कार; पदाधिकार्‍यांचा प्रवेश सोहळा
बीड  :जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदार निवडून आणण्याची जिम्मेदारी माझ्या खांद्यावर आहे. जिथे ज्या पक्षाचा आमदार, ती जागा त्याच पक्षाची असे सुनिश्चित झाले आहे. त्यामुळे उर्वरित जागांची वाटाघाटी होईल. अद्याप माझीही परळीची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे योग्यवेळेला योग्य उमेदवाराची घोषणा होईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्याकडे नजर रोखून केले. एकप्रकारे त्यांनी उमेदवारीचे संकेत दिले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तापदी निवडीबद्दल पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचा सत्कार आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश सोहळा बीड शहरातील के.एस.के. महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवारी (दि.२०) सायंकाळी १० वाजता उत्साहात झाला. यावेळी सत्कारमूर्ती म्हणून ना.मुंडे हे बोलत होते.
व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब घुगे, अल्पसंख्याक सेलचे बीड जिल्हाध्यक्ष इकबाल सय्यद, जिल्हा संघटक सिद्दिकी सादेक, माजी सभापती काकासाहेब जोगदंड, नाळवंडीचे सरपंच ड.राजेंद्र राऊत, माजी नगरसेवक जैतुल्ला खान, बाबुराव दुधाळ, गणेश वाघमारे, बाळासाहेब गुंजाळ, ड.विकास जोगदंड, शुभम धूत, सय्यद इलियास, मुन्ना इनामदार, प्रेम चांदणे, रविंद्र कदम, सरपंच अमोल बागलाने आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक आघाडीच्यावतीने विशाळगड प्रकरणी ना.धनंजय मुंडे यांना निवेदन दिले.
पुढे बोलताना ना.धनंजय मुंडे म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मजबूत होत आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर बीडमध्ये पहिलाच कार्यक्रम होत आहे. तो पराजय जिव्हारी लागणारा असून त्यावर मात करायची असेल तर आगामी निवडणुकीतील विजय सुनिश्चित करावा लागेल. मी पुरोगामी कार्यकर्ता असून कधीही जात-पात पाहिली नाही, मला ही स्व.गोपीनाथ मुंडे यांनी शिकवण आहे. तरीही आमची जात पाहून पराभव केला. हे आगामी राजकारणासाठी चांगले नाही. त्यामुळे आता तरी विकासावर निवडणुका व्हाव्यात, आपल्या भागातून विकास करण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वाला संधी द्यावी. आजपर्यंत अनेक निवडणुका पाहिल्या, परंतु एखाद्याला पाडायचे म्हणून झालेली ही लोकसभेची निवडणूक झाली. तरीही मोठे मताधिक्य दिल्याबद्दल जनतेचे आभार मानतो. पराभव झाला असला तरी जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबध्द आहोत. जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा महायुती जिंकणार आहे. पूर्वी मुख्य लढत परळीची असायची, आता ती बीडची असेल. जिल्ह्यात सर्व घटकांसाठी भरीव निधी दिला. यापुढे परळीला जेवढा निधी येईल, त्या बरोबरीने बीडला दिला जाणार आहे. ना.अजित पवारांनी ऐतिहासिक अर्थसंकल्पातून लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेची नोंदणी करण्यात राज्यात बीड जिल्हा तिसर्‍या क्रमांकावर आहे. हा आर्थिक लाभ रक्षाबंधनापूर्वी थेट खात्यात जमा होणार आहे. पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या योजनेत अधिकाधिक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शासनाच्या अशा योजनांचा लाभ देण्यासाठी डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिकाताई क्षीरसागर हे प्रयत्नशील असतात. यासोबतच त्यांनी ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रोजगार मेळावा, आरोग्य शिबिरासह इतर सामाजिक उपक्रमांचे तोंडभरून कौतुक केले. प्रास्ताविक डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.पांडुरंग सुतार यांनी केले. आभार नवगण संस्थेचे संचालक आमेर काझी यांनी मानले.
ना.धनंजय मुंडे हे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून देशात नावलौकिक करतील : डॉ.योगेश क्षीरसागर
प्रास्ताविकात डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वात बीड शहराचा सर्वांगीण विकास झाला. अलीकडे वाढती लोकसंख्या, हद्दवाढ पाहता बीड शहरासह मतदारसंघात रस्ते, पाणी, विजेचे प्रश्न निर्माण झाले आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी भरीव निधी द्यावा. शहरात नागरी सुविधा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांना निर्देश द्यावेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे चित्र आजघडीला राहिलेले नाही. आगामी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वक्तृत्वाची मुलुख मैदानी तोफ असलेले धनंजय मुंडे हे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून देशात नावलौकिक करतील, असा विश्वास डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री, आमदार समर्थकांचा
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
नाळवंडी गणाचे पंचायत समितीचे माजी सदस्य अच्युतराव शेळके, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जकी, रा.कॉं. शरदचंद्र पवार पक्षाचे एससी सेलचे बीड तालुकाध्यक्ष विनोद उर्फ दादा हातागळे, वांगीचे सरपंच अशोक वाघमारे, पिंपळगावचे उपसरपंच संतोष तेलप, रुईगव्हाणचे ग्रा.पं.सदस्य बालाजी नाईकवाडे, लिंबारुईचे युवराज ठाणगे, माजी नगरसेवक सुनील महाकुंडे, अंजनवतीचे उपसरपंच आप्पा मोरे, सदस्य पांडुरंग येडे, लोणीघाटचे माजी सरपंच भास्कर जाधव, काळेगाव हवेलीचे सरपंच भारत कानाडे, भोई समाज संघटनेचे अध्यक्ष दत्ता गुणवंत यांच्यासह माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि आमदार समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांनी रा.कॉं.पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे ना.धनंजय मुंडे, डॉ.योगेश क्षीरसागर यांनी स्वागत केले.

ताज्या बातम्या