नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे विवाहितेच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. आत्महत्या असल्याचा दावा फेटाळत माहेरच्यांनी हत्या झाल्याचा आरोप केला असून कॉल रेकॉर्डिंगमुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात २९ वर्षीय विवाहित महिलेच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. भाग्यश्री गौरव चौधरी या विवाहितेचा मृत्यू सुरुवातीला आत्महत्या असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. भाग्यश्रीचा मृत्यू आत्महत्या नसून नियोजित हत्या असल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पती आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली असून दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.
१२ जानेवारी रोजी शहादा शहरात भाग्यश्री गौरव चौधरी यांनी फाशी घेतल्याची घटना समोर आली होती. मात्र मृत्यूनंतर तिच्या आई संगीता चौधरी आणि भाऊ विकी चौधरी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत आत्महत्येचा दावा फेटाळून लावला आहे. आमची मुलगी आत्महत्या करूच शकत नाही, तिची हत्या करण्यात आली असल्याचा ठाम आरोप त्यांनी केला आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, भाग्यश्रीचे पती गौरव चौधरी याचे अन्य एका महिलेशी प्रेमसंबंध होते. या कारणावरून घरात सातत्याने वाद होत असल्याची माहिती आहे. तपासादरम्यान पती, पत्नी आणि कथित प्रेयसी यांच्यातील संवादाचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले असून, त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य अधिक वाढलं आहे.
या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत शहादा पोलिसांनी पती गौरव चौधरी आणि त्याच्या कथित प्रेयसीला अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सध्या पोलीस कॉल डिटेल्स, तांत्रिक पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे शहादा शहरात संतापाचं वातावरण असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

