वडवणी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवडी फाटा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अतुल झाटे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विजय आगे, श्री. गितेश आगे व श्री. शेषनारायण झाटे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. मुख्याध्यापक श्री. बगाडे सर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शाळेचा माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला असून अध्यक्षपदी श्री. गितेश आगे यांची निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली तर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी लेझीमचे सुंदर प्रदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. इयत्ता पाचवीतील नियमित उपस्थित विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राऊत सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. शेख सर यांनी केले. कार्यक्रमासाठी श्री. चांभारे सर, श्रीमती मोरे मॅडम, शेख मॅडम व श्रीमती वरोडे मॅडम यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास गावातील शिक्षणप्रेमी नागरिक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

