spot_img
4.2 C
New York
Monday, December 1, 2025

Buy now

spot_img

बीडच्या तरूणाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर तर प्रेयसीचा खोलीत

प्रेमसंबंधातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पुणे शहर हादरले आहे. प्रियकराचा मृतदेह तळेगाव रेल्वे ट्रॅकवर तर त्याचवेळी प्रेयसीचा मृतदेह संगमवाडी परिसरातील त्याच्या भाड्याच्या खोलीत आढळून आला. या दुहेरी मृत्यूमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
अधिकच्या माहितीनुसार, मृत तरुणाचे गणेश काळे (२१, रा. बीड) आणि मृत तरुणीचे नाव दिव्या निगोश (२०, रा. येरवडा) आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यातून पुढील तपास केला जात आहे. गणेश आणि दिव्या दोघेही पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. नोकरीदरम्यान दोघांची ओळख झाली आणि त्यातूनच प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे समजते. गणेश काळे संगमवाडीतील दुर्गामाता मंदिर परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता. शनिवारी रात्री तळेगाव रेल्वे ट्रॅकवर गणेशचा मृतदेह आढळला. त्याच वेळी दिव्या बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे केली होती. शोधमोहीम सुरू असताना पोलिसांनी गणेशच्या खोलीत प्रवेश केला असता दिव्याचाही मृतदेह आत आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असेही पोलिसांनी सांगितले. दिव्याच्या नाकावर आणि चेहर्‍यावर व्रण आढळल्यामुळे, तिचा खून करून गणेशने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून प्रेमसंबंधातील वादातून ही दुर्दैवी घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या