परळी तालुक्यातील हेळंब गावात घडलेल्या एका थरारक घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. भावकीतील काही लोकांनी एकाच कुटुंबावर घरात घुसून जीवघेणा हल्ला केला. लाठ्या, काठ्या, दांडक्यांनी बेदम मारहाण करत वडिलांसह तीन मुलांना गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी त्या कुटुंबातील मुलीला विष पाजल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.
मारहाण झालेल्या पित्याने सांगितले, ’ मारहाण केलेल्या लोकांवर याआधीच छेडछाड, मारहाण अंतर्गत एक केस दाखल केलेली आहे . दाखल केलेली केस मागे घे नाहीतर जीवे मारतो असं म्हणत कुर्हाडीचा दांड्याने, काठ्यांनी मला व माझ्या मुलांना मारहाण करत बेशुद्ध केलं . एका मुलीलाही बेदम मारहाण करत बेशुद्ध केलं . व दुसर्या मुलीला विष पाजलं . गावातील दोन चार लोकांनी दवाखान्यात आणलं . आधी पोलीस ठाण्यात नेलं त्यानंतर दवाखान्यात घेऊन जा म्हटले . पोलीस ठाण्यातून फोन आला आंबेजोगाईला जा . ’
या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ ही समोर आला आहे. .या व्हिडिओत चार-पाच जण पीडित वडील वासुदेव आंधळे यांना बेदम मारहाण करत आहेत .वडिलांना सोडवायला मध्ये पडलेल्या मुलीला एकजण ढकलतो .तिच्या मागे पळतो . तिला बेदम मारहाण करताना दिसतोय .ही घटना घडत असताना कुटुंबातील लोकांच्या किंकाळ्यांनी परिसर अक्षरशः हादरला आहे
ही घटना इतकी भीषण होती की मारहाण झाल्यानंतर वडील आणि मुलं सर्वजण बेशुद्ध पडले. आरोपी मात्र घटनास्थळावरून फरार झाले. या संपूर्ण हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या घटनेनंतर पीडित कुटुंबाने ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली, मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली. शेवटी वडील वसुदेव विक्रम आंधळे यांनी न्याय मिळावा म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. तिथून मात्र अंबाजोगाईला जाऊन निवेदन द्या असं सांगण्यात आलं. निराश झालेल्या या वडिलांनी आता थेट पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे न्यायाची आर्त हाक दिली आहे.

