सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला फलटण पोलीस दलातील पोलीस उपमहानिरीक्षक गोपाळ बदने याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. गेल्या काही तासांपासून पोलीस गोपाळ बदनेच्या मागावर होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अखेर शनिवारी रात्री गोपाळ बदने याने स्वत:हून फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. यानंतर पोलिसांकडून त्याला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. गोपाळ बदने याला आज न्यायालयात हजर केले जाऊ शकते. दरम्यान, गोपाळ बदने याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मी प्रामाणिक आहे. न्यायालय जो काही निर्णय देईल त्यावर माझा विश्वास आहे. माझा पोलीस प्रशासनावरही विश्वास आहे, असे गोपाळ बदने याने म्हटले.
मृत डॉक्टर तरुणीने फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या हातावर काही मजकूर लिहला होता. यामध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर हे दोघे आपल्या आत्महत्येसाठी कारणीभूत असल्याचे डॉक्टर तरुणीने म्हटले होते. तसेच गोपाळ बदने याने आपल्यावर चारवेळा बलात्कार केल्याचेही या सुसाईड नोटमध्ये म्हटले होते. त्यामुळे फलटण पोलीस गोपाळ बदनेच्या मागावर होते. मात्र, गोपाळ बदने त्यांना गुंगारा देत फिरत होता. त्याचे शेवटचे मोबाईल लोकेशन पंढरपूर येथे आढळून आले होते. त्यानंतर गोपाळ बदने याने मोबाईल बंद केला होता. मोबाईल लोकेशनचा आधार घेऊन बीड, पुणे आणि पंढरपूर भागात सातारा पोलिसांकडून शोधमोहीम सुरु होती. अनेक तास उलटूनही गोपाळ बदने पोलिसांच्या हाती लागत नसल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. परंतु, शनिवारी रात्री गोपाळ बदने स्वत:हून फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. आता त्याच्या चौकशीतून कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी शनिवारीच अटक केली होती. प्रशांत बनकर याला फलटण येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाकडून प्रशांत बनकर याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यामुळे आता या दोघांच्या चौकशीतून डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येविषयी कोणती नवीन माहिती समोर येणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

