spot_img
24.1 C
New York
Saturday, September 6, 2025

Buy now

spot_img

अंबाजोगाईत अग्नितांडव

दुकाने जळून खाक
अंबाजोगाई : तालुक्यातील घाटनांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास भीषण अपघात घडला. सोमेश्वर हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत एकामागोमाग दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. दुकानावरील पत्रे उडून गेली तर शेजारच्या दुकानांनाही मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, डिडवाणी यांच्या पाईपच्या दुकानात प्रथम आग लागली. ही आग काही वेळातच शेजारील अरसुडे यांच्या सोमेश्वर हॉटेलमध्ये पसरली. आगीत हॉटेलमधील गॅस सिलेंडर पेट घेऊन सलग दोन स्फोट झाले. या स्फोटांच्या धक्क्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडत असल्याने दूरवरून धुराचे लोट दिसत होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आगीत नेमके किती नुकसान झाले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र आजूबाजूच्या अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. रात्रीची वेळ असल्याने सर्व दुकाने बंद झाली होती, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई आणि परळी येथील अग्निशमन दल तातडीने दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. अद्यापही आग धुमसत असल्याची माहिती आहे. नेमकी आग कशामुळे लागली हे तपासाअंती स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या भीषण घटनेमुळे घाटनांदूरमध्ये काही काळ भीतीचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

ताज्या बातम्या