बीड : आपल्या जिल्ह्याची बदनामी झाली आहे हे सुधारण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. चुका करणार्याला शासन झालं पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षातला असो अशा शब्दात बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. एकीकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन अजित पवार यांनी बीडकरांना केलंय. तर दुसरीकडे त्यांच्या स्टाईलने गुन्हेगारांना, आरोपींना, बीडमधील गुंडाना तंबीही दिली आहे.मला वाकड्यात जायला लावू नका, सांगूनही ऐकलं नाही तर मोक्का लावणार, असा इशाराच पालकमंत्र्यांनी आजच्या बीड (लशशव) दौर्यात दिला.
मला वाकड्यात जायला लावू नका, सांगूनही ऐकलं नाही तर अशा लोकांना मोक्का लावण्यात येईल, मग पुन्हा काय चक्की पिसिग पिसिंग …. असे म्हणत अजित पवारांनी गुन्हेगारांना ठणकावून दम भरला. बीडसाठी चांगल्यातले चांगले अधिकारी देणार असून जिल्ह्यातील सगळ्यांकडूनच सहकार्याची अपेक्षा आहे. त्यामुळे, कुणीही चुकीचं काम करू नये, असे अजित पवारांनी बीडमधील कार्यक्रमात बोलतना म्हटले. अजित पवार आज सकाळपासूनच बीडमध्ये दाखल झाले असून विविध विकासकामांची पाहणी, प्रशासकीय बैठका घेत आहेत. त्यासमवेतच, परळीतील मुंडे पिता-पुत्राचा आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश झाला.
वडवणीतील भाजपाचे मुंडे पिता पुत्र अखेर राष्ट्रवादीत आले असून वडवणी येथील राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडेंचा अजित पवारांच्या उपस्थिती राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश झाला. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात हा प्रवेश संपन्न झाला असून धनंजय मुंडेंची या सोहळ्याला उपस्थिती नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वडवणीच्या मुंडे कुटुंबीयांनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंची साथ सोडली, अजित पवारांच्या सभेत धनंजय मुंडे यांचाही फोटो नाही. त्यामुळे, बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. धनंजय मुंडेंना निमंत्रण नसल्याने त्यांनी येणं टाळले, विशेष म्हणजे धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीत अजित पवारांचा पहिलाच राजकीय कार्यक्रम झाल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, वडवणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पक्षप्रवेश कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला पावसाचे ग्रहण लागले आहे. दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने सभा मंडपाला अक्षरशः गळती लागली होती. मंडप गळत असल्याने कार्यकर्त्यांनी देखील कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.