spot_img
19.1 C
New York
Wednesday, September 17, 2025

Buy now

spot_img

नोकिया स्मार्टपूर प्रभाव आणि अंतर्दृष्टी : वार्षिक सादरीकरण व क्षमता बांधणी कार्यशाळा

नाशिक : आयोजक : REACHA संस्था, नोकिया CSR च्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या स्मार्टपूर प्रकल्पांतर्गत
REACHA संस्थेने, Nokia CSR च्या आर्थिक सहकार्याने, “स्मार्टपूर प्रभाव आणि अंतर्दृष्टी : वार्षिक सादरीकरण व क्षमता बांधणी कार्यशाळा” चे आयोजन १८ जुलै २०२५ रोजी हॉटेल किरीयाड, नाशिक येथे केले. या कार्यशाळेचा उद्देश स्मार्टपूर प्रकल्पाच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा सादर करणे, सहभागी संस्था व व्यक्तींची क्षमता वृद्धिंगत करणे आणि शासन, स्वयंसेवी संस्था, बँका, तसेच समुदायाशी संलग्न नेतृत्व यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करणे असा होता.
स्मार्टपूर प्रकल्प सध्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सिन्नर या तीन तालुक्यांतील एकूण २० गावांमध्ये कार्यरत आहे. हा प्रकल्प शिक्षण, शासकीय सेवा, वित्तीय समावेशन, उपजिविका आणि आरोग्य या पाच महत्त्वाच्या स्तंभांवर केंद्रित आहे.

या कार्यशाळेमध्ये ६५ सहभागींनी हजेरी लावली, ज्यात विविध शासकीय अधिकारी, संस्थात्मक प्रतिनिधी, ग्रामविकास अधिकारी, स्मार्टपूर समिती सदस्य, लाभार्थी व केंद्र चालक सहभागी झाले होते.
या कार्यशाळेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, या माध्यमातून सप्टेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत स्मार्टपूर प्रकल्पातून साधलेली प्रगती, आव्हाने, यशोगाथा, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामीण भागात निर्माण झालेला सकारात्मक परिणाम याचा सखोल आढावा सादर करण्यात आला.
राज्य प्रकल्प प्रमुख श्री. हरीश वैद्य यांनी REACHA संस्थेचा १९९२ पासूनचा प्रवास सादर केला. त्यांनी संस्थेची स्थापना, विविध राज्यांतील कार्यक्षेत्र, विविध भागीदार संस्था व शासन यांच्यासह चालवलेले उपक्रम याविषयी माहिती दिली. तसेच, स्मार्टपूर प्रकल्पात नाशिक जिल्ह्यातील २० गावांमध्ये होत असलेले काम, तिथले डिजिटल सशक्तीकरण, उपजीविकेच्या संधी, महिला सक्षमतेसंदर्भातील कामगिरी आणि लाभार्थ्यांवरील परिणाम सविस्तर मांडले.
कार्यशाळेदरम्यान विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी थेट संवादाचे सत्र घेण्यात आले. लाभार्थ्यांनी आपल्या यशोगाथा शेअर केल्या आणि अधिकाऱ्यांनी त्यांना योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शन दिले. प्रकल्पातील केंद्रचालकांचा आणि सामुदायिक संस्थांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यशाळेस खालील मान्यवर उपस्थित होते:
• डॉ. प्रशांत धर्माधिकारी – जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन विभाग
• श्री. विजय रिसे – सहायक आयुक्त, कौशल्य विकास विभाग
• श्री. सागर भाबड – अधिकारी, कौशल्य विकास विभाग
• श्री. अशोक पवार – कायदेशीर सल्लागार, महिला व बालकल्याण विभाग
• कु. पी. ए. काळगे – विस्तार अधिकारी, पंचायत समिती, सिन्नर
• सौ. अनुराधा लोढे – वित्तीय सल्लागार, बँक ऑफ महाराष्ट्र
• श्री. समीर कुलकर्णी – मास्टर ट्रेनर, RSETI
• सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर येथील ११ ग्रामविकास अधिकारी
कार्यशाळेचा शेवट स्थानिक स्वराज्य संस्था, शासन यंत्रणा आणि REACHA यांच्यातील समन्वय आणखी मजबूत करून ग्रामीण भागातील शेवटच्या टप्प्यापर्यंत सेवा आणि संधी पोहोचवण्याच्या निर्धाराने करण्यात आला.
REACHA संस्था ही १९९२ साली श्री. जे. सी. पंत (IAS, सेवानिवृत्त १९६१ – उत्तर प्रदेश) यांच्या संकल्पनेतून स्थापन झाली. गेल्या तीन दशकांपासून ही संस्था भारतातील विविध राज्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, उपजिविका, पर्यावरण आणि सुशासन क्षेत्रात शासकीय विभाग, कॉर्पोरेट्स आणि सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने प्रभावी उपक्रम राबवत आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील २० गावांमध्ये नोकिया स्मार्टपूर प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात येत आहे.

ताज्या बातम्या