spot_img
24.9 C
New York
Saturday, July 12, 2025

Buy now

spot_img

अंबाजोगाईत तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न

अंबाजोगाई : शहरातील मुकुंदराज मंदिराजवळील कड्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका युवतीचा जीव पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व त्यांच्या सहकार्‍यांनी वाचविला.
राधा नरेश लोमटे (वय २२, रा. खडकपुरा, अंबाजोगाई) असे त्या युवतीचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या राधावर सध्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आज दुपारी सुमारे बारा वाजता राधा लोमटे ही घरातून निघून थेट मुकुंदराज टेकडीवर गेली. मंदिराच्या कड्यावरून तिने थेट खाली उडी घेतली. घटनास्थळी काही नागरिक उपस्थित होते. त्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस कर्मचारी कांदे, वडकर, मुंडे, चादर आणि चालक जरगर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तिथे पोहोचून त्यांनी तात्काळ खाली उतरून युवतीला जिवंत अवस्थेत वर आणले व तिला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
विशेष बाब म्हणजे, दोन वर्षांपूर्वी राधा लोमटे हिच्या सख्ख्या भावाने देखील याच मुकुंदराज कड्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्या घटनेचा मानसिक परिणाम राधाच्या मनावर झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या संपूर्ण घटनेबाबत पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी सांगितले की, राधाला शंभर टक्के जीवदान मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. आमच्या पथकाने वेळेवर दाखवलेली तत्परता हीच तिच्या जीविताचे कारण ठरली.
घटनेनंतर शहरात पोलीस पथकाच्या धाडसी कार्याची सर्वत्र स्तुती होत असून, सोशल मीडियावरही या कर्मचार्‍यांचे कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या