बीड : निकटवर्तियांच्या कारनामाम्यांमुळे बीडमधील लोकप्रतिनिधी अडचणीत येत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यापाठोपाठ आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निकटवर्तीयांचे कारनामे समोर आलेत. त्यामुळे हे दोन्ही नेते अडचणीत आहेत. अशामध्ये आता आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाचा कारनामा समोर आला आहे. प्रकाश सोळंके यांचा निकटवर्तीय एका व्यक्तीला बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडमुळे आमदार धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यानंतर बीड जिल्ह्यातून अनेक लोकप्रतिनिधींच्या निकटवर्तीयांचे कारनामे समोर येत आहेत. आमदार सुरेश धस हे त्यांचा निकटवर्तीय सतीश भोसले उर्फ खोक्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यानंतर संदीप क्षीरसागर यांच्या पीएचा मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ते चर्चेत आले. त्यानंतर आता माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाचा देखील एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे..
आमदार प्रकाश सोळंके यांचा निकटवर्तीय सुशील सोळंके आणि त्याची पत्नीने एका मल्टी सर्विसेस सेंटरच्या चालकाला बेदम मारहाण केली आहे. ही घटना जुनी असली तरी सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन ही अद्याप सुशील सोळंकेला अटक झालेली नाही. तर उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सुशील सोळंके माजलगावमध्ये असताना देखील पोलिस त्याला अटक का करत नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान या व्हिडीओमुळे आमदार प्रकाश सोळंके यांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आमदार सतीश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याने पितापुत्राला अमानुष माराहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो चर्चेत आला. त्यानंतर त्याचे दहशत माजवणारे अनेक व्हिडीओ समोर येत आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण पोलिसांनी अद्याप त्याला अटक केली नाही. सतीश भोसले सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. खोक्याच्या या प्रकरणामुळे सुरेश धस अडचणीत आहेत. पण या प्रकरणात सतीश भोसले दोषी असेल तर त्याच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.