पुणेः देशभरातील तब्बल १२ लाख ५८ हजार १३६ विद्यार्थ्यांनी जानेवारीत पहिल्या सत्रात झालेली ’जेईई मेन २०२५’ ही परीक्षा दिली. या परीक्षेत तब्बल १४ विद्यार्थ्यांना जेईई मेन परीक्षेतील पेपर एकमध्ये १०० एनटीए स्कोअर मिळविण्यात यश आले आहे. यात महाराष्ट्रातील विशाद जैन या विद्यार्थ्याला १०० एनटीए स्कोअर मिळाला आहे.
देशातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये बी.ई आणि बी.टेक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी ही परीक्षा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत (एनटीए) घेतली जाते. यंदा या परीक्षेसाठी १३ लाख ११ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील १२ लाख ५८ हजार १३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा २२, २३, २४, २८ आणि २९ जानेवारी दरम्यान ३०४ शहरांमधील ६१८ केंद्रांवर घेण्यात आली. यात देशाबाहेरील १५ केंद्रांचाही समावेश होता.
संगणक आधारित चाचणी स्वरूपात ही परीक्षा असामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमीळ, तेलगू आणि उर्दू अशा १३ भाषांमध्ये घेण्यात आली. एनटीएने जेईई मेन परीक्षेतील बी.ई. आणि बी.टेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या पेपर एकचा निकाल जाहीर केला आहे. तर बी. आर्च आणि बी. प्लॅनिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या पेपर दोनचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही एनटीएने स्पष्ट केले आहे. या परीक्षेत गैरप्रकार केल्याचे आढळून आल्याने एनटीएने अशा ३९ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.