परळी : जवळील शिरसाळा येथे दोन गटात वाद झाला. या वादात दोन्ही गट एकमेकांसमोर आल्याने त्यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये एक बुलेट गाडी पेटविण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात शिरसाळा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून याचा तपास करण्यात येत आहे.
परळी तालुक्यातील शिरसाळा येथे सदरची घटना घडली आहे. शिरसाळे येथे आठवडे बाजार भरलेला होता. या आठवडी बाजारात विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी चिकन शॉप चालक सैफ सलीम कुरेशी यांना पोहनेर येथे व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यायचे अशी धमकी दिली. या कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. हा वाद उद्भवल्यानंतर दोन गट आपापसात भिडले आणि त्यांच्यात हाणामारी झाली.
दुकान लावण्याच्या कारणावरून दोन गटात वाद निर्माण होऊन त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. यानंतर त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. एकमेकांना लाठ्या काठ्यांनी मारहाण देखील करण्यात आली. यामुळे बाजारपेठ परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. या दरम्यान बाजूलाच उभी असलेल्या बुलेटवर पेट्रोल टाकून पेटविण्यात आली होती.
दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यानंतर सदर प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस गुन्हेगारीवर जरब बसवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होत असल्याचे समोर येत आहे.