सिन्नर : सिन्नर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेव लोंढे यांचे चिरंजीव सागर याच्यावर बुधवारी (दि.१८) दुपारी पावणेदोनच्या सुमारास अज्ञात तिघा हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला. वावी वेस भागातील लोंढे यांच्या दोस्ती ट्रेडर्स या दुकानात हल्ल्याची घटना घडली.
चौघा हल्लेखोरांपैकी तिघांनी चाकू हल्ला तर एकाने सागर याच्या दिशेने पिस्टलमधून दोन राउंड फायर केल्याचीदेखील माहिती मिळत आहे. सागर हा जखमी झालेला असून खासगी रुग्णालयात प्राथमिक औषधोपचारांनंतर त्याला नाशिक येथे पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले असल्याचे समजते.दरम्यान, घटनेनंतर हल्लेखोरांनी कारमधून नाशिक-पुणे महामार्गाने नांदूरशिंगोटेच्या दिशेने पलायन केले. मात्र पोलिसांनी नांदूरशिंगोटे बायपासवर नाकाबंदी केलेली असल्याने भंबेरी उडालेल्या हल्लेखोरांची कार निमोण रस्त्याजवळ दुभाजकाला धडकली. त्यानंतर हल्लेखोरांनी ह्युंडाई कार (क्र.एमए ०३ सीएस ४२१२) आहे तशीच सोडून पलायन केले. वावी पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे.पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनीही घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलेले आहे. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस घटनेची कसून चौकशी करीत आहेत.