spot_img
8.3 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img

पवनचक्की प्रकरणाने सरपंच देशमुख यांचा घात

केज : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचे भर रस्त्यातून दुपारी अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला असल्याने केज तालुक्यात खळबळ माजली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच या पवनचक्की प्रकरणात मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्या संदर्भात संतोष देशमुख आक्रमक झाले होते. त्याच प्रकरणातूनच हे हत्याकांड झाल्याचे समोर येत आहे.
या बाबतची माहिती अशी की, मस्साजोग चे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख हे त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख यांच्यासोबत दिनांक ९ डिसेंबर रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिगो गाडीमधून क्र.(एम एच ४५/बी ३०३२) मस्साजोगकडे जात होते. त्यावेळी शिवराज देशमुख हे गाडी चालवीत होते. ते केज येथुन मस्साजोगकडे जात असताना डोणगाव फाट्याच्या जवळ असलेल्या टोलनाक्या जवळ एका काळ्या रंगाची स्कार्पिओ क्र. (एम एच ४४/झेड ९३३३) स्कार्पिओ आडवी लावली. त्या गाडीतुन सहा जण खाली उतरले. त्यातील एकाने दरवाज्याची काच दगडाने फोडुन गाडीत पाहिले व दुसर्‍या डाव्या साईडच्या बाजुला जावुन सरपंच संतोष देशमुख यांचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढून लाकडी काठीने मारहाण केली. अपहरणकर्त्यानी त्यांना सोबत आणलेल्या काळ्या रंगाची स्कार्पिओमध्ये बळजबरीने बसवुन केजच्या दिशेने भरधाव वेगात निघुन गेले.
या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी ही सुदर्शन घुले रा. टाकळी तालुका केज यांची असल्याची माहिती आहे. अपहरण केल्या नंतर अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने दोन पोलीस पथके तपासासाठी रवाना करण्यात आली होती. पोलिसांना संतोष देशमुख यांचा मृतदेह केज ते नांदूर घाट रस्त्यावर दहीटना फाटा येथे आढळून आला. मयताच्या अंगावर मारहाणीचे व शास्त्राचे वार आहेत. पोलिसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय केज येथे आणला आहे.
दरम्यान, सुदर्शन घुले यांनी दिनांक ६ डिसेंबर रोजी मस्साजोग येथे अवादा पवन ऊर्जा या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असलेले सुरक्षा रक्षक हे मस्सा जोग येथील असल्याने सरपंच संतोष देशमुख यांनी त्यात हस्तक्षेप करून मारहाण करणार्‍यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यानी त्यांचा खून केला असल्याची चर्चा सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच मस्साजोग येथील नागरिक मोठ्या प्रमाणात पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले आहेत. आरोपी ताब्यात घेई पर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी जादा कुमक मागवली आहे.
सरपंच यांना गाडीत टाकून नेले आणि खून केला घटना दुर्दैवी व प्रचंड वेदना देणारी आहे. तरुण सरपंचाचा खून म्हणजे बीडचा बिहार असे खा. बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे. पवनचक्की च्या खंडणी प्रकरणात झालेला खून व त्या मागे कुणाचा हात आहे हे शोधले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक जर फोन उचलणार नसतील तर गंभीर आहे. आपण सदरील प्रश्न लोकसभेत उपस्थित करणार असून झालेला खून हा बीड पोलीस यंत्रनेवर प्रश्न उपस्थित करणारा आहे, असेही खा. सोनवणे म्हणाले.
दरम्यान, महिला व पुरुष रस्त्यावर बसलेले असून संतप्त नागरिकांनी तीन एसटी बसेसची तोडफोड केली आहे. या मार्गावरील वाहतूक काळेगाव-हनुमंत पिंपरी-केवड-चिंचोली माळी मार्गे वळविण्यात आली आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंबाजोगाई विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि बीडचे अप्पर पोलीस अधिकक्षक मस्साजोग येथे तळ ठोकून असून पोलीस मारेकर्‍यांच्या मागावर आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांना अटक होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही आणि रस्त्यावरून उठणार नाही, अशी भूमिका गावकर्‍यांनी घेतली असल्याने वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या