महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा भाजपचे आमदार राहुल नार्वेकर विराजमान झाले आहेत. त्यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा आज सोमवारी विधानसभेत करण्यात आली. आज विधानसभेत यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर नार्वेकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. रविवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी नार्वेकर यांचा एकमेव अर्ज आला होता. विरोधी पक्षाने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आज त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यासाठी सभागृहात प्रस्ताव मांडल्यानंतर त्याला अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांच्या एकमताने निवडीची घोषणा केली.
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल फडणवीस यांनी त्यांचे सभागृहात अभिनंदन केले. विधानसभा अध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखल्याने विरोधी पक्षांचे आणि नेत्यांचे मी आभार मानतो, असे फडणवीस म्हणाले. न्याय देण्याचे काम आपल्याकडून होईल. त्याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही, असा विश्वास फडणवीस यांनी नार्वेकर यांच्याबद्दल व्यक्त केला. ते अभ्यासू, संयमी व्यक्तिमत्व असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.