मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची आणि पक्षांची चांगलीच धांदल उढाली असून, राज्यात अखेरच्या एका दिवसात ४ हजार ९९६ उमेदवारांचे एकूण ६ हजार ४८४ अर्ज दाखल झाले. त्यामुळे आता राज्यातील २८८ मतदारसंघांत एकूण ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यातही सर्वच पक्षांमध्ये बंडखोरही भारंभार झाले आहेत.
अखेरच्या दिवशी मंत्रालयातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्यासह निवडणूक कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग देखील उशीर पर्यंत कार्यालयात उपस्थित होता. आता उमेदवारी अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी होणार असून ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येतील.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर महायुतीच्या बाजूने तीन आणि महाविकास आघाडीच्या बाजूने तीन पक्ष असे राज्यात सहा राजकीय पक्ष तयार झाले. यावेळी महायुतीकडून तीन आणि मविआकडून तीन असे सहा पक्ष निवडणूक रिंगणात असल्याने या पक्षांकडून तिकिटासाठी इच्छुक असलेल्यांची संख्याही जास्त होती. त्यात युती-आघाडीमुळे वाट्याला आलेले मतदारसंघ कमी आणि इच्छुक जास्त यात ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही त्यातील अनेकांनी बंडखोरी केल्याने यावेळच्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरांचे पेव फुटले आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत स्पष्ट झालेल्या बंडखोरीच्या चित्रावरून काही ठिकाणी पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने विद्यमान आमदारही बंडखोरी करून रिंगणात उतरले आहेत.