spot_img
5.5 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img

बाबा सिद्दीकीच्या मारेकर्‍याला पास्ते गावचे सुपूत्र संदीप आव्हाडने झडप मारून पकडले

ज्ञानेश्वर काकड । नाशिक
मुंबई येथे दि.१२ ऑक्टोबर २०२४ रोजी विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी ०९.०० वा चे सुमारास राम मंदिर,खेरवाडी, बांद्रा पूर्व मुंबई येथे देवी विसर्जन मिरवणूक सुरु होती. शेजारीच माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचे कार्यालय होते. तेथे कार्यकर्त्यांना भेटण्याकरिता बाबा सिद्दिकी आले होते. त्याचवेळी अचानक आलेल्या तीन मारेकर्‍यांनी माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला व तेथून पळून जाऊ लागले. त्या दिवशी रात्रपाळी करीता निर्मल नगर मोबाईल दोन या सरकारी गाडीवर संदीप आव्हाड व सहाय्यक फौजदार सावंत हे गस्तीदरम्यान चिल्ड्रन कॉम्प्लेक्स समोर बांद्रा पूर्व मुंबई येथे निर्जन स्थळ व अंधार्‍या जागी गस्त करीत असताना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमोल वाकडे यांनी संदीप यांच्याकडे पळत येऊन राम मंदिर समोर फायरींग झाली असून आरोपी चिल्ड्रन कॉम्प्लेक्स मध्ये घुसला आहे असे सांगितले.
त्यावेळी संदीप आव्हाड हे निशस्त्र असताना देखील प्रसंगावधान राखून गाडीतून उतरून वाकडे यांच्यासोबत चिल्ड्रेन कॉम्प्लेक्स च्या मेन गेटमधून आत मध्ये घुसले. अंधारात कोणीतरी लपत लपत जात असल्याचे संदीप यांना जाणवले. तेंव्हा संदीप व अमोल वाकडे त्या इसमाकडे जात असताना तो पोलिसांना बघून आणखी दाट असलेल्या झाडीमध्ये घुसला. तेंव्हा संदीप आणि अमोल वाकडे त्याच्या दिशेने चालत जात असताना संदीप यांना पिस्टल मध्ये मॅक्झिन लोड करत असल्याचा आवाज आल्याने संदीप आव्हाड यांनी जीवाची कुठलीही पर्वा न करता तात्काळ त्याच्यावर झडप घातली व त्याला पकडले. त्यास ताब्यात घेऊन सपोनी दाभाडे यांच्या ताब्यात दिले. याही तणावपूर्ण व भीतीदायक अशा परिस्थितीमध्ये संदीप यांनी सदर इसमाला विचारले की तू अंधेरी मे क्या कर रहा था, और तेरे हाथ में क्या था यावर त्याने सांगितले मेरे पास घोडा था और वो वही पे गिर गया. त्यावेळी संदीप आव्हाड आणि अमोल वाकडे यांनी पुन्हा त्या जागेवर जाऊन मोबाईल टॉर्च च्या उजेडात बघितले असता एक पिस्टल व एक जिवंत राऊंड आणि एक बॅग देखील पडल्याचे दिसले. त्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये तीन जिवंत राऊंड मिळून आले. संदीप यांनी केलेल्या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे २६/११ च्या हल्यासारखी मोठी परिस्थिती निर्माण होणे टळले व निरापराध लोकांचा जीव वाचला. या त्यांच्या अतुलनीय धाडसी कामगिरीबद्दल त्यांना मुंबई पोलीस दलामार्फत गौरविण्यात आले असून पास्ते गाव व परिसरामध्ये संदीप आव्हाड यांच्या शौर्याची सर्वत्र चर्चा व प्रशंसा होत आहेत. याबाबत संदीप आव्हाड यांचे वडील अशोक बाबुराव आव्हाड यांना विचारले असता त्यांनी सांगितले की लहान पासूनच संदीप धाडसी असल्यामुळे त्याने पोलीस दलात जायचे ठरवले होते. आणि आज तर बाबा सिद्दिकी यांच्या मारेकर्‍याला पकडून त्याने आमची पोलीस दलाची मान समाजासह देशात उंच केली आहे याबाबत मी खूप समाधानी आहे.

ताज्या बातम्या