केज : केज तालुक्यातील सारुळ फाटा येथील एका कला केंद्रावर काम करीत असलेल्या तृतीयपंथी डान्सरचा मस्साजोग येथील लॉजवर संशयास्पदरित्या गळफास घेऊन मृत्यू झाला. या तृतीयपंथी डान्सरने स्वत: जीवन संपविले की, त्याचा खून झाला, याची चर्चा सुरू आहे. मागील वर्षी याच कला केंद्रातील एका डान्सरचा एका लॉजवर खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याचा प्रकार तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी उघडकीस आणला होता.
याबाबतची माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथील ओंकार उर्फ गार्गी बबन ढलपे हा तृतीयपंथी बीड मांजरसुंबा रोडवरील सारुळ फाटा येथे रामनाथ ढाकणे यांच्या रेणुका कला केंद्रावर गायिका व नर्तिका कलाकार म्हणून काम करीत होता.
दरम्यान, हा तृतीयपंथी आपल्या प्रियकरासोबत गुरूवारी (दि.१५) मस्साजोग येथील अजिंक्य हॉटेल अँड लॉज येथे गेला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि.१६) पहाटे पाच वाजता लॉजमधील कर्मचारी रूममध्ये गेला. त्यावेळी त्याला या तृतीयपंथीचा मृतदेह लॉजमधील खोलीत फॅनच्या हुकाला ओढणीने लटकलेला व रूममध्ये कॉटवर दोन्ही गुडघे टेकलेल्या अवस्थेत आढळून आला. या कर्मचार्याने ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक कादरी, पोलीस जमादार दत्तात्रय बिक्कड, पोलीस नाईक संतोष गित्ते, पोलीस नाईक मतीन शेख यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविला. शवविच्छेदनानंतर नातेवाईक व तृतीयपंथी यांनी जेज येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले. या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही.
जून २०२३ रोजी रेणुका कला केंद्रात डान्सर म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असलेल्या शितल कांबळे हिचा बरड फाट्यावर राजयोग लॉजवर नेऊन गजानन उर्फ गज्जू कराळे याने तीक्ष्ण धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर वार करून खून केला होता. खून केल्यानंतर गजानन उर्फ गज्जू हा पळून गेला होता. मात्र त्यानंतर उद्धव घुगे याच्यासह कला केंद्राचा मालक आणि त्यांचे साथीदार यांनी मयत शितलच्या नातेवाईकांना धमकी देऊन हे प्रकरण पोलिसांना कळू न देता मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.या खूनप्रकरणी अडीच महिन्यानंतर मृत शितल कांबळेच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अडीच महिन्यानंतर २४ ऑगस्ट २०२३ रोजी गजानन उर्फ गज्जू कराळे, त्याचा मित्र उद्धव घुगे, कला केंद्राचा मालक रामनाथ ढाकणे याच्यासह सहा जणांविरुद्ध खून करून पुरावा नष्ट करणे या आरोपाखाली केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.