लातूर : भाजप आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर लातूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा आंदोलकांनी सार्वजनिक शौचालयासमोरच आमदार नितेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध केला. यापुढे जरांगे यांच्यावर टीके केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही आंदोलकांनी दिला.
मनोज जरांगे हे आधुनिक मोहम्मद जिना आहेत, त्यांच्या आंदोलनाचा फायदा हा मराठ्यांना कमी आणि मुस्लिमांना जास्त झाल्याचं आमदार नितेश राणे म्हणाले होते. त्यामुळे नितेश राणे यांच्या विरोधात लातूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले. लातूरमध्ये मराठा आंदोलकांनी नितेश राणे यांना पाळीव कुत्र्याची उपमा दिली. यावेळी संतप्त आंदोलकांनी नितेश राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा चक्क शौचालयाच्या दारातच दहन केला.
यापुढे मनोज जरांगे यांच्यावर जर कोणी टीकाटिप्पणी केली तर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला. मराठा समाज बांधवांनी रेणापूर फाटा या ठिकाणी हे आंदोलन केलं. नितेश राणे यांच्या प्रतिकत्मक पुतळ्याचे मराठा आंदोलकांनी दहन करत जोरदार घोषणाबाजी केली.