नाशिकच्या माजी नगरसेविका प्रा.डॉ. वर्षा भालेराव यांचे आयुक्तांना निवेदन
नाशिक : नाशिक महानगरात डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यूने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असून त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे.नाशिक महानगरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढण्यास महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याचे निष्क्रिय अधिकारी जबाबदार आहेत. प्रतिबंधात्मक कोणतीच उपाययोजना हाती न घेतल्याने शहरामध्ये डेंग्यूने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे.जुलै महिन्यातच महानगरात ४०० हून अधिक रुग्ण आढळले यावरून या रोगाची व्याप्ती लक्षात येते. काही रुग्ण दगावल्याचेही कळते यावर तातडीने उपाययोजना कराव्या अशा आशयाचे निवेदन नाशिक मनपाच्या माजी नगरसेविका व भाजपच्या उपाध्यक्ष प्रा.डॉ.वर्षा भालेराव यांनी मनपा आयुक्त यांना दिलेले आहे..
महापालिका हद्दीत अनधिकृतरित्या डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा ५०० ते ६०० पर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येते. एडीस इजिप्ती या डासांमुळे डेंग्यूच्या आजाराला निमंत्रण मिळते.त्याचा नायनाट करण्यास योग्य त्या अळीनाशक औषधांचा पुरवठा महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य विभागामार्फत केला पाहिजे.परंतु त्यांच्यातर्फे कोणतीच पावले उचलली जात नसल्याने डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असल्याचे निदर्शनास येत असून आरोग्य खात्याच्या दृष्टीने ही बाब निश्चितच भूषणावह नाही. नाशकातून डेंग्यूला हद्दपार करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करावी आणि नाशिककरांचेआरोग्य अबाधित राखावे अशी मागणी प्रा.डॉ.वर्षा भालेराव यांनी केली आहे