नाशिक : देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण महाविकास आघाडीला टिकवता आले नाही. सरसकट आरक्षण देणे घटनाबाह्य आहे. आर्थिक मागास आरक्षण गेल्याने मराठा समाजानं स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारून घेतली, असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, १९६७ साली ओबीसी आरक्षणाची सुरुवात झाली. ज्यांना मागास ठरवलं गेलं त्यांना घटनात्मक आरक्षण दिले गेले. शाहू महाराजांच्या काळात आरक्षण दिले गेले. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले ते महाविकास आघाडीला टिकवता आले नाही. सरसकट आरक्षण देणे हे घटनाबाह्य आहे. आर्थिक मागास प्रवर्गाला १० टक्के एससीबीसी आरक्षण दिले. ज्यांना जातीय आरक्षण आहे त्यांना एससीबीसी आरक्षण दिले जात नाही. आर्थिक मागास आरक्षण गेल्याने मराठा समाजानं स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारून घेतली, असे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, मराठा, ब्राह्मण, लिंगायत समाज १० टक्के आरक्षणातून बाहेर पडले. शाहू महाराजांच्या काळापासून सुरू असलेल्या आरक्षणाचा विचार केला पाहिजे. मनोज जरांगे पाटील मनापासून मराठा आरक्षणासाठी काम करत आहेत. देशात पितृसत्ताक पद्धतीने आरक्षण मिळते. मातृसत्ताक पद्धतीने आरक्षणाची मागणी कोर्टाने अनेकदा फेटाळली आहे, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.