बीड : जिल्ह्यामध्ये शहरासह ग्रामीण भागातही चोरट्यांनी धुमाकूळ घालत अनेक ठिकाणी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. काल पुन्हा आष्टी तालुक्यातील केरूळ येथील भागवत वस्तीवर आठ ते नऊ दरोडेखोरांनी मध्यरात्री धुमाकूळ घातला. यामध्ये लाखो रूपयांच्या रक्कमेसह ऐवज लंपास केला.
केरूळ येथील टेंभीच्या माळाजवळ असलेल्या भागवत वस्तीवर सोमवारी संध्याकाळी मध्यरात्री आठ ते नऊ दरोडेखोरांनी काठ्या-कु-हाडी व धारदार हत्यारे घेत राजू महादेव भागवत यांच्या घरात प्रवेश केला. कुटुंबातील सर्वांना काठ्यांनी मारहाण करीत व चाकूचा धाक दाखवत दहशत माजवली.
घरातील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली. दरोडेखोरांना विरोध करणा-या राजू महादेव भागवत (वय 30 वर्षे) या तरूणावर चाकूचे वार केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना नगर येथे उपचारांसाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, केरूळ येथील भागवत वस्तीवर दरोडा टाकल्यानंतर चोरटे पसार झाले. गावात या घटनेची माहिती गावात समजताच अनेकांनी धाव घेतली. घटनेची माहिती 112 क्रमांकावर दिल्यानंतर पोलिसांची गाडी घटनास्थळी आली. तोपर्यंत दरोडेखोर दूरवर गेल्याने त्यांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह आष्टी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात चोरी व दरोड्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. आठ दिवसांपूर्वी तालुक्यातील किन्ही येथील काकडे वस्तीवर दरोडा पडला होता. या दरोड्यात सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेत चोरट्यांनी कुटुंबातील व्यक्तींना मारहाण केली होती. या घटनेचा तपास लागलेला नसतानाच आता केरूळ येथेही पुन्हा अशीच घटना घडल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासनाने चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.