विधानभवनात पार पडला शपथग्रहण समारंभ
मुंबई् : भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेतली. विधानपरिषदेच्या उप सभापती नीलम गोर्हे यांनी त्यांना शपथ दिली.
विधानपरिषदेवर नुकत्याच निवडून आलेल्या अकरा सदस्यांना आज सकाळी विधानभवनातील सभागृहात शपथ देण्यात आली. पंकजाताई मुंडे यांना उपसभापती मा. नीलम गोर्हे यांनी शपथ दिली. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे तसेच सर्व नवनिर्वाचित सदस्य देखील उपस्थित होते. उप सभापतींनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
आ.पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्यात
भगवान भक्तीगड, नारायण गडाचे घेणार दर्शन ; बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तर परळीत गोपीनाथ गड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना करणार वंदन
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे उद्या सोमवारी २९ जुलै रोजी बीड जिल्ह्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडी तसेच राज्याच्या वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून त्यांची झालेली निवड या अर्थाने संवैधानिक पद घेतल्यानंतर त्या प्रथमच बीड जिल्ह्यात येणार आहेत. मात्र या दौर्यात कोणतेही हार तुरे अथवा सत्कार त्या स्वीकारणार नसून जिल्ह्यात विविध ठिकाणी त्या महापुरुषांना वंदन करणार आहेत.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य म्हणून पंकजाताई मुंडे यांची निवड झाली. आज त्यांनी सदस्य म्हणून शपथ घेतली. राज्याच्या वरिष्ठ सभागृहात निवड झाल्यानंतर प्रथमच त्या आपल्या जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या बीड जिल्ह्यात येणार आहेत. मात्र या दौर्यात हार-तुरे नको, सत्कार नको, माझ्या स्वागताचा बडेजाव करू नका असे त्यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे. त्यामुळे दि. २९ जुलै रोजीच्या बीड जिल्हा दौर्यात पंकजाताई मुंडे विविध ठिकाणी महापुरुषांना माल्यार्पण व वंदन करणार आहेत.
सोमवार २९ जूलै सकाळी १० वा. संत भगवानबाबांची जन्मभूमी श्रीक्षेत्र भगवान भक्तीगड, सावरगाव घाट, बीड, दुपारी १२ वा.श्रीक्षेत्र नारायणगड येथे दर्शन दुपारी २ वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बीड येथे वंदन ,सायंकाळी ४ वा.गोपीनाथ गड दर्शन,सायंकाळी ५ वा.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रेल्वे स्टेशन परिसर, परळी वैजनाथ येथे वंदन.दरम्यान या दौर्यात पंकजाताई मुंडे या कुठलेही स्वागत स्वीकारणार नाहीत. तसेच कुठल्याही प्रकारचे हारतुरे, फुले, पुष्पगुच्छ स्वीकारणार नाहीत अशी माहिती संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.