गेवराईत पूजा मोरे यांनी केलेल्या आंदोलनाला यश
बीड : साईराम मल्टिस्टेट व ज्ञानराधा मल्टिस्टेट सह अन्य बँकांमध्ये ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. ठेवीदारांना आश्वासनावर आश्वासनेच दिली जात आहेत. ठेवीदारांनी आपल्या पैशासाठी विविध आंदोलने केली मात्र हाती निराशाच लागते. यातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या किसान सेलच्या प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे यांच्या नेतृत्वात दि.४ रोजी गेवराईच्या छ.शिवाजी महाराज चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत हलगी बजाओ मोर्चा काढला होता. या आंदोलनाने पोलीस प्रशासन चांगलेच हादरले होते. काल दि.२५ रोजी मादळमोही ( ता. गेवराई) येथील टेलरिंग व्यवसाय करणार्या तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्यासह ३०३ खातेदारांना ९ कोटी ३७ लाख ७१ हजार ७४७ रूपयांना फसवल्याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात कुटे, कुलकर्णीसह १५ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. तर बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाच्या तक्रारीवरून कुटे, कुलकर्णीसह १० जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान आधीच बीडच्या एलसीबीला घोटाळेबाज यशवंत कुलकर्णी अजुनही सापडलेला नाही. त्यातच आज पुन्हा कुलकर्णीवर दोन गुन्हे दाखल झाले आहे. एलसीबीचा ताण आणखी वाढला आहे. किती ठेवीदारांनी आत्महत्या केल्यावर कुलकर्णीचा आणि साईराम मल्टिस्टेटच्या श्री. साईनाथ परभने यांचा शोध घेणार आहे ? असा प्रश्न पुजा मोरे यांनी विचारला आहे.
गेवराई तालुक्यात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याने पूजा मोरे यांच्या नेतृत्वाखाली हलगी बजाओ आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी गुन्ह्यात सर्वच खातेदारांना रेकॉर्ड वर घ्या ही मागणी करण्यात आली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. प्रवीणकुमार बांगर यांच्या पुढाकाराने मादळमोही येथील संजय लक्ष्मण येवले यांनी दिलेल्या फिर्यादीत अन्य ३०३ खातेदारांच्या नावाची यादी जोडून जिल्ह्यातील आजपर्यंतचा सर्वात मोठा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये श्री. संजय येवले यांची स्वतःची २ लाख ३५ हजार ९०० रकमेसह अन्य ३०३ खातेदार असे एकूण ९ कोटी ३७ लाख ७१ हजार ७४७ रूपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी, वसंत शंकरराव सताळे, आशिष पदमाकर पाटोदेकर, दादाराव हरिदास उंद्रे, वैभव यशवंत कुलकर्णी, कैलास काशिनाथ मोहिते, शिवाजी रामभाऊ पारसकर, रविंद्र मधुकर ताळवे, आशा पदमाकर पाटील, रेखा वंसतराव सताळे, रघुनाथ सखाराम खरसाडे, रविंद्र श्रीरंग यादव या १३ संचालकांसह मादळमोही शाखेचे मॅनेजर सचिन हडतगुगे, कॅशिअर उमेश कोटावळे या १५ जणांविरुध्द गेवराई पोलिस ठाण्यात कलम ४०६, ४०९, ४२०, १२० (बी) भादवीसह कलम ३, ४ एमपीआयईप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि जंजाळ करीत आहेत. तर दुसरा गुन्हा बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी अध्यक्ष सुरेश कुटे, अर्चना सुरेश कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी, आशिष पदमाकर पाटोदकर, वैभव यशवंत कुलकर्णी, जनरल मॅनेजर नारायण सुगंदराव शिंदे, शिवाजी उमाटे, सतिष आणि वामकर या दहा जणांविरुध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि भोरे हे करीत आहेत.