वडवणी : तालुक्यातील देवडी फाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात, शिस्तीत व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीमध्ये शाळेच्या परिसरात आकर्षक पताके लावण्यात आले होते तसेच विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळी काढून शाळेला सणासुदीचा देखणा साज चढवला होता.
सकाळी विद्यार्थ्यांची जोशपूर्ण प्रभातफेरी काढण्यात आली. वंदे मातरम् जय हिंद, भारत माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीने भारावून गेला. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर सर्वांनी *संविधानाप्रती निष्ठा राखण्याची व साक्षरतेची शपथ* घेतली.या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेला *प्रोजेक्टर भेट देणारे श्री. एकनाथ झाटे यांच्या मातेचा सन्मान व शाळेसाठी ३० लेझीम भेट देणार्या मोरे मॅडम यांचा सन्मान करण्यात आला. या दोन्ही दात्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
याच दिवशी पहिलीच्या वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. या वर्गासाठी नवीन शैक्षणिक साहित्य लावून, रंगीत चार्ट, अक्षर-चित्रे, संख्या फलक इत्यादी शैक्षणिक साहित्य चिटकवून वर्ग सुशोभित करण्यात आला. त्यामुळे हा वर्ग आकर्षक व अध्ययनाला पूरक असा तयार झाला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीट व खाऊ वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, माता-पालक व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीबरोबरच कृतज्ञता व शैक्षणिक प्रेरणा निर्माण करणारा ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.बगाडे सर, सूत्रसंचालन गोवर्धन राऊत सर तर आभार शेख सर यांनी मानले. यावेळी श्री.चांभारे सर, शेख मॅडम, वरोडे मॅडम व ग्रामस्थ उपस्थित होते.

