नाशिक | ज्ञानेश्वर काकड
श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने नासिक येथे सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळेस समाजातील विविध क्षेत्रातील विविध पक्षाचे ज्येष्ठ नागरिक समाजसेवक अधिकारी विद्यार्थी शिक्षक आणि समाज बांधव उपस्थित होते संस्थेचे सचिव श्री रंगनाथ दरगुडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांसाठी एक मोठा आदर्श निर्माण केलेला आहे. ते असे म्हणाले आंबेडकरांकडून विद्यार्थ्यांनी काय शिकावे ?
६ डिसेंबर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. हा दिवस फक्त महामानवाला वंदन करण्याचा नसून विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. बाबासाहेबांचे आयुष्य म्हणजे ‘शिकण्याची अखंड तळमळञ, ‘अडचणींना न घाबरण्याची जिद्दञ आणि ‘ज्ञान हीच खरी शक्तीञ हा मूलमंत्र जिवंतपणे जगलेले महान व्यक्तिमत्त्व.!
प्रतिकूल परिस्थितीतही ‘शिक्षण’ हेच ध्येय
डॉ. आंबेडकरांचे बालपण जातीय विषमता, दारिद्र आणि सामाजिक भेदभावाने व्यापलेले होते.तरीसुद्धा बाबासाहेबांना शिक्षण घेण्याची ओढ प्रचंड होती.त्यांचे वडील रामजी सकपाळ यांनी शिक्षण हेच तुमचे खरे भांडवल असा मोलाचा संस्कार दिला.रामजी सकपाळ यांनी इंग्रज अधिकार्यांच्या मदतीने पुण्यातील पंतोजी शाळेतील परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यांच्या धारिष्ट आणि चिकाटीमुळेच कितीही अडथळे आले तरी विद्याभ्यास सोडायचा नाही हा निर्धार बाबासाहेबांच्या रक्तात भिनला होता.
दहावीपर्यंतचा प्रवास
सातार्याला त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. बाबासाहेबांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा प्रवास खडतर होता. शाळकरी वयातच वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची आई त्यांना सोडून गेली. मात्र,त्यांनी शाळेला सोडले नाही. शाळेलाच आई बनवून विद्यार्जन केले.शाळेतल्या अडथळ्यांना विद्यार्थ्यांनी ऐकले तरी अंगावर काटा येईल.शाळेत त्यांना माठातील पाणी पिण्याची परवानगी नव्हती. हाताची ओंजळी करून त्यांना खाली बसावे लागत आणि वरून कोणीतरी तुच्छतेने पाणी ओतत. त्यातून त्यांना तहान भागवावी लागत होती. शिक्षक त्यांच्या वह्या, पुस्तकांना हात लावत नसत. त्यांची वह्या पुस्तके तपासत नसत. त्यांचा गृहपाठही विटाळ होतो म्हणून तपासला जात नसे. शिक्षकाचाही तिरस्कार त्यांना सहन करावा लागला. तरीही शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्याला तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, हे वाक्य त्यांनी समाजाला सांगितले. विद्यार्थ्यांसाठी हे वाक्य आजही प्रेरणादायी आहे. समस्यांचे भांडवल करण्यापेक्षा लढणे शिका. शिक्षण आत्मसात करा. हा साधा आत्मबोध त्यांच्या या संघर्षातून मिळतो.
उपाशी राहिलात तरी चालेल पण शिक्षण सोडू नका. आजच्या विद्यार्थ्यांनी या एका वाक्याचा अर्थ खोलात समजून घ्यावा. मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडिया, स्पर्धा-आजच्या अडचणी त्या काळाच्या तुलनेत क्षुल्लक आहेत. मात्र विदेशात शिकताना त्यांनी राजकारणात पासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. लालाजींना त्यांनी नम्रपणे सांगितले, बडोदा नरेश यांनी मला अपरिमीत सहाय्य केले आहे. त्यांना दिलेलं वचन न मोडता आपला अभ्यास करणे हेच आपले कर्तव्य आहे कधी काय पकडावे व कधी काय सोडावे याचा वस्तूपाठही त्यांनी विद्यार्थ्यांसाठी या घटनेतून दिला आहे.
विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांकडून काय शिकावे?
सर्वात महत्वाचे म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग देश बांधणीसाठी केला. थोडक्यात आज महापरिनिर्वाणदिनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना विद्यार्थ्यांनी काही गोष्टींची उजळणी करणे आवश्यक आहे. तुमच्या हातात पुस्तक बाबासाहेबांमुळे मिळाले आहे त्यांनी तुमच्या शिक्षणाची सोय केली आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे शिक्षणासंदर्भातील काही आदर्श निश्चित गिरवले पाहिजे.
१. अडचणींना न घाबरणे : परिस्थिती कशीही असो, शिक्षण सोडू नये.
२. स्वप्न मोठे ठेवणे : अमेरिकेत, लंडनमध्ये जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न बघा.
३. कठोर परिश्रम : एक-एक डिग्री रक्ताचं पाणी करून मिळवली.
४. शिस्त आणि वेळेचे नियोजन : अभ्यासात शिस्त कळीचा मुद्दा बनली आहे.
५. शिक्षणाचा सामाजिक उपयोग : पदवी ती समाजाची सेवा करण्यासाठी वापरा.
६. मनाची स्वतंत्रता : शिक्षण माणसाला विचार करण्याचं स्वातंत्र्य देते महत्त्वाचे.
७. सतत शिकत राहणे : पदव्या मिळाल्या तरी ते आयुष्यभर शिकत राहिले.
८. आराखडा आखा : मला शिक्षणातून अंतत: काय मिळवायचे ह ठरवा.
आजच्या महापरिनिर्वाण दिनी विद्यार्थ्यांनी एवढेच लक्षात ठेवावे. या भारत भूमीतील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेब हे सर्व दृष्टीने एक आदर्श विद्यार्थी म्हणून कित्ता गिरवीण्यायोग्य आहे. भारताच्या इतिहासात असा गुणी विद्यार्थी कुणीही झालेला नाही. त्यांना मानवंदना देताना त्यांच्यासारखे गुणी होण्याची शपथ घेण्याचा आजचा दिवस आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपक शेवाळे संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार कुमार चैतन्य दरगुडे यांनी केला श्री योगेश वाणी श्री मनोज परदेशी श्री पठाडे श्री बेडसकर श्री थोर मिशी श्री पवार श्री जाधव श्री काळे श्री साईनाथ श्री जगदाळे असे सर्व समाज बांधवांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.

