बीड : जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार असल्याने, रविवारी (सुटीच्या दिवशीही) सर्वच पालिकांमध्ये उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी अर्जही दाखल केले. तर आज शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंतच वेळ असल्याने सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली आहे. अनेक उमेदवार शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत असल्याचीही माहिती आहे.
सत्ताधारी महायुतीतील राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाने निवडणुकीच्या तोंडावर धावपळ सुरू केली आहे. पक्षाने केवळ धारूर आणि गेवराईत नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले आहेत, तसेच धारूरमध्ये नगरसेवक पदाचेही उमेदवार जाहीर झाले; पण बीडसह इतर प्रमुख शहरांमध्ये अजूनही उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुकांमध्ये प्रचंड धावपळ सुरू आहे. भाजप आणि इतर प्रमुख पक्षांकडूनही अनेक जागांवर अजून अधिकृत घोषणा झालेली नसल्याने, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

