spot_img
7.7 C
New York
Friday, November 14, 2025

Buy now

spot_img

बीडमध्ये पत्नीच्या मदतीने दुसर्‍या पत्नीवर गोळीबार करणारा पती अटक

बीड : किरकोळ वादातून दुसर्‍या बायकोवर गोळी झाडली. त्यानंतर फरार होत तीन महिने घरफोड्या केल्या. पुन्हा तिलाच जेवणाचे पार्सल घेऊन भेटायला जात असतानाच कुख्यात गुन्हेगाराला हॉटेलवर सापळा रचून सिनेस्टाईल बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्याकडून पाच गुन्हे उघड झाले असून साडेचार लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी केली.
संदीप्या ईश्वर्‍या भोसले (वय ३०, रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर, ह.मु. खामगाव, ता. गेवराई) असे पकडलेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. संदीप्याला पहिली मटक नावाची बायको आहे, ती बेलगाव येथे राहते. साधारण चार महिन्यांपूर्वी मटक, तिचा भाऊ आणि संदीप्या हे दुसरी बायको शीतलकडे खामगावला आले होते. त्यांच्यात चोरीच्या साहित्याच्या वाटपावरून वाद झाला. यात गोळीबार झाला आणि शीतलच्या कमरेत गोळी लागून ती गंभीर जखमी झाली. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

 

संदीप्या हा अट्टल गुन्हेगार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत होते. शुक्रवारी तो शीतलला भेटायला येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे एलसीबीने गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन फाट्यावर सापळा लावला. संदीप्या आणि त्याचा लहान भाऊ भगवान हे दोघेही एका हॉटेलवर शीतलसाठी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आले होते. त्यांनी स्वतःसाठी दारूही घेतली. पोलिस दिसताच त्यांनी पळायला सुरुवात केली. बाजूच्या उसाच्या शेतात पळत असताना संदीप्याला पकडण्यात आले, पण त्याचा भाऊ उसातून फरार झाला. त्यांच्याकडे शस्त्र असण्याची भीती असल्याने पोलिसही सावध होते. संदीप्याला पिंपळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
संदीप्या हा गोळीबार करून फरार झाला होता. तो कधी खामगाव, तर कधी बेलगाव असा मुक्काम करायचा, पण तरीही तो दिवसा घरफोड्या करत असे. पिंपळनेर पोलिस ठाणे हद्दीत दोन, अंमळनेर, नेकनूर, शिरूर येथे त्याच्याकडून पाच गुन्हे उघड झाले आहेत. तसेच साडेचार लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिनेही हस्तगत केले आहेत. हा सर्व मुद्देमाल त्याने पहिली बायको मटक हिच्याकडे बेलगावला ठेवला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, स.पो.नि. धनराज जारवाल, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, हवालदार सोमनाथ गायकवाड, अशोक दुबाले, राहुल शिंदे, बाळू सानप, विकास राठोड, अंकुश वरपे, अशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे आणि नितीन वडमारे हे पथक कारवाईत सहभागी होते.

ताज्या बातम्या