नाशिक : तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने बीजारोपण व वृक्षारोपण करणाऱ्या डॉ. मंगल सांगळे व प्रियांका केदार ह्यांनी सिन्नर तालुक्यातील शहापूर येथील प्रगतिशील शेतकरी प्रकाश विठोबा सोनवणे व यमुना प्रकाश सोनवणे यांच्या अंगणात ‘रोपटे आमचे अंगण तुमचे’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जांभूळ व खिरणीची रोपे लावून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
जागतिक तापमान वाढीसारख्या समस्यांना सामोरे जाऊन जीवसृष्टी वाचवायची असेल तर अधिकाधिक वृक्षारोपण व बीजारोपण करण्याची नितांत गरज असल्याचे यावेळी डॉ. मंगल सांगळे यांनी सांगितले.
तसेच हिरवळ पसरविण्यासाठी आम्ही तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून अविरतपणे कार्यरत आहोत व यापुढेही हा उपक्रम आणखी वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे तरुप्रीत प्रकल्पाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील निसर्गप्रेमी प्राध्यापक राहुल बोडके तसेच साक्षी प्रकाश सोनवणे हे देखील उपस्थित होते.
वर्षभर तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून पर्यावरणपूरक काम केले जाते. ‘रोपटे आमचे अंगण तुमचे’ ह्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

