वडवणी : डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू हा संशयास्पद असून, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव उचलून पोस्टमार्टम करण्यासाठी घेऊन जाताना त्यांच्या कुटुंबातील लोक येईपर्यंत सुद्धा थांबण्याची तसदी स्थानिक पोलिसांनी का घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित करत डॉक्टर संपदा मुंडे या एमबीबीएस शिकलेल्या व सुज्ञ आणि शासकीय सेवेत डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या तरुणीने आत्महत्या करावी, ही आत्महत्या की आणखी काही वेगळे आहे? संपदा च्या मृत्यूवादी तिने केलेल्या तक्रारी व त्यावरून झालेल्या चौकशा आणि जबाब तसेच मृत्यूनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडी या सर्वच गोष्टी संशयास्पद असल्याने डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूच्या प्रकरणासह या आधीच्या तक्रारी त्यावरील झालेल्या चौकशी या सर्व बाबींची एका वरिष्ठ आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी समिती स्थापन करून सर्व बाजूंनी वस्तुनिष्ठ चौकशी करण्याची मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
सातारा जिल्ह्यातील काही ठराविक पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे डॉक्टर संपदा यांच्या यापूर्वीच्या तक्रारी व चौकशीमध्ये समाविष्ट असल्याने सातारा जिल्ह्यात सेवेत असलेल्या एकही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला या एसआयटीमध्ये नेमण्यात येऊ नये अशी ही मागणी करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी आज डॉक्टर संपदा मुंडे यांच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव या गावी भेट देऊन मुंडे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
अतिशय कष्टातून शिकवून आपल्या मुलीला डॉक्टर बनवून जीवन दानाच्या कार्यास समर्पित करणाऱ्या माता पित्याच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या भावना, त्यांचे दुःख हे हृदय हेलावून टाकणारे आहेत.
आमच्या एका उंद्या तरुण भगिनीची अशी अकाली निधनाने जीवन यात्रा संपली, तिची आत्महत्या की घातपात या सगळ्या गोष्टींचा बारकाईने तपास होणे अजून बाकी आहे, मात्र काही जण तिच्या चारित्र्यावर संशय निर्माण करून त्याचे मृत्यू पश्चात नाव खराब करण्याचे काम करत आहेत हे देखील समाज मनाला न पटणारे आहे.
संपदा ने कर्तव्यावर असताना खोटे किंवा चुकीचे रिपोर्ट बनवून देण्यास नकार दिला. तसेच अशा प्रकारे खोटे रिपोर्ट देण्यासाठी दबाव टाकणाऱ्या अधिकारी किंवा अन्य वरिष्ठान बाबत आपल्या वरिष्ठांकडे तसेच पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असता उलट तिलाच वेगवेगळ्या चौकशांमध्ये अडकवण्यात आले. इतकेच नव्हे तर ती बीडची आहे व मुंडे आहे म्हणून देखील तिचा मानसिक छळ करण्यात आला, असा स्पष्ट उल्लेख तिने दिलेल्या जबाब देखील आढळून आला आहे.
त्यामुळे डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्र एसआयटी समिती स्थापन करण्यात यावी व दोषींना कठोर शासन व्हावे यासाठी येत्या दोन दिवसात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
दरम्यान मागील काही दिवसांच्या माध्यमातून उठ सूट कोणीही माध्यमांच्या समोर उभे राहून बीड जिल्ह्याची जी बदनामी केली त्या बदनामीचा परिपाक हा डॉ. संपदा यांचा बळी आहे. पोट भरायला किंवा शिकायला जिल्हा बाहेर गेलेल्या लोकांना या बदनामीमुळे हीन वागणूक दिली जात असून ही विस्कटलेली विन बसवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी नेत्यांसह माध्यमांना सुद्धा केले.
दरम्यान गेवराई तालुक्यातील गरकळ नामक एका ऊसतोड मुकादम यांनीही यावेळी माध्यमांच्या समोर स्वतः सोबत घडलेली घटना सांगताना एका कारखानदाराने आपल्या बाकी राहिलेल्या पैशांसाठी मारहाण करून अटक दाखवण्यासाठी डॉक्टर संपदा मुंडे यांना फिटनेस सर्टिफिकेट द्या यासाठी दबाव टाकला होता, मात्र मला बीपी व शुगर असल्यामुळे फिटनेस सर्टिफिकेट देता येणार नाही असे डॉक्टर संपदा मुंडे यांनी सांगितले तेव्हा त्यांच्यावर दबाव निर्माण केला गेला तसेच मला मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली होती असे संबंधित मुकादमाने सांगितले. यावेळी विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

